Maharashtra Mahapalika Election 2026 Pudhari
ठाणे

Municipal Election 2026: मतदानापूर्वीच महायुतीचं 'अर्धशतक', 65 उमेदवार बिनविरोध विजयी; सर्वाधिक कोणत्या महापालिकेत?

Maharashtra Mahapalika Niwadnuk 2026: राज्यभरात महायुतीची घोडदौड; 65 उमेदवार बिनविरोध विजयी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे/मुंबई : येत्या 15 जानेवारीला 29 महापालिकांसाठी मतदान होणार असताना सत्ताधारी महायुतीने विरोधकांना हादरा देत आपले 65 उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. यामध्ये भाजपाचे 44, शिवसेना 19, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधकांचा फक्त 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला.

बिनविरोध निवडून आलेल्या 66 सदस्यांमध्ये सर्वाधिक 40 नगरसेवक ठाणे जिल्ह्यातील आहेत. यामध्ये 22 महिला नगरसेविकांचा समावेश आहे. त्याखालोखाल सात बिनविरोध नगरसेवकांसह पनवेल आणि ठाण्याने दुसरा क्रमांक लावला.

ठाण्यात सहा महिला

पुणे महापालिकेमध्ये भाजपचे 2, तर पिंपरी - चिंचवडमध्ये 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना - भाजप महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेच्या 131 जागांपैकी शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. एकट्या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपाचे 15 आणि शिवसेना 6 मिळून 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण - डोंबिवली महापालिकेत तब्बल 15 उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची किमया साधली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपले कौशल्य दाखवत तेथे शिवसेनेचे सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले आहेत. भिवंडी महापालिकेत भाजपाने सहा, ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत.

कल्याण-डोंबिवलीत भाजपाच्या रंजना पेणकर, आसावरी नवरे, मंदा पाटील, ज्योती पाटील, रेखा चौधरी, मुकंद तथा विशू पेडणेकर, महेश पाटील, साई शेलार, दिपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, हर्षदा भोईर, डॉ.सुनिता पाटील, पूजा म्हात्रे, रविना माळी, मंदार हळबे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेणकर यांच्या विरोधात दाखल झालेले सर्व उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले. तर उर्वरित बारा उमेदवारांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या अनेक उमेदवारांनी माघार घेतली. त्याचवेळी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी यांच्यासह 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

ठाण्यात शिंदेंची कमाल

ठाण्यात प्रभाग क्रमांक 18 मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार जयश्री फाटक बिनविरोध विजयी झाल्या. त्या माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या पत्नी आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार स्नेहा नागरे यांनी माघार घेतली तर मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा अर्ज बाद झाल्याने त्या विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 18 मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सुखदा मोरे या देखील बिनविरोध विजयी झाल्या. त्या शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या समोर काँग्रेसच्या उमेदवार वैशाली पवार आणि मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. प्रभाग क्रमांक 17 मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार एकता भोईर बिनविरोध विजयी झाल्या. एकता भोईर यांच्या समोर कोणत्याही मोठ्या पक्षाने उमेदवार न दिल्याने आणि सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने एकता भोईर बिनविरोध विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 18 मधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राम रेपाळे हे देखील बिनविरोध विजयी झाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विक्रांत घाग यांनी माघार घेतल्याने तसेच काँग्रेससह सर्व अपक्षांनी माघार घेतल्याने राम रेपाळे विजयी ठरले. प्रभाग क्रमांक 14 मधून शीतल ढमाले बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

पनवेलमध्ये भाजपाचे सात बिनविरोध

पनवेल महापालिकेत भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत भाजपाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. नितीन पाटील, अजय बहिरा, दर्शना भोईर, रुचिता लोंढे, प्रियंका अजय कांडपिळे, ममता प्रीतम म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार विजय स्नेहल ढमाले हे सात उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत.

भिवंडीत भाजपची बिनविरोध मुसंडी

भिवंडीत परेश चौगुले, दीपा मढवी, अबू साद लल्लन, अश्विनी फुटाणकर भारती हनुमान चौधरी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. याआधी वार्ड क्रमांक 17 मधून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील यांनी बिनविरोध विजय मिळवला होता. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कल्याण डोंबिवलीत तब्बल 20 जणांनी अर्ज माघारी घेतल्याने सत्तारूढ भाजप शिवसेनेचे 20 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या महापालिकेत आता 102 जागांसाठी निवडणूक होणार आहे. बिनविरोध आलेल्यांमध्ये भाजपचे 14 आणि शिवसेनेचे 6 नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेत तब्बल 7 नगरसेवक बिनविरोध आले आहेत. विरोधकांच्या उमेदवारांनी काही ठिकाणी माघार घेतली, तर काहींचे अर्ज बाद झाले. भिवंडीत 6 आणि पनवेलमध्ये 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. ही एकूण संख्या चाळीस झाली आहे.

कल्याण - डोंबिवली 15, पुणे 2, पिंपरी चिंचवड 2, पनवेल 7, भिवंडी 6, धुळे 4, जळगाव 6, अहिल्यानगर 3 असे एकूण भाजपचे 44 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. ही बिनविरोध निवड म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार करत असलेल्या विकास कामांवर मतदारांचा असलेला विश्वास आहे.
रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT