Maharashtra Water Storage, pudhari photo
ठाणे

Maharashtra Water Storage : मुंबई-ठाण्याला पाणी पुरविणाऱ्या धरणांमध्ये ८२% जलसाठा; मराठवाड्यात ३७% पाणी शिल्लक

नागपूर क्षेत्रातील ३८७ धरणांमध्ये ५६.३६ टक्के पाणी शिल्लक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मराठवाडा - विदर्भात दुष्काळ जाहीर झाला असताना कोकणातील धरणातील पाण्याचा साठा सकारात्मक असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आजमितीला कोकणातील धरणांमध्ये ८२ टक्के पाणी साठा उपलब्ध असतानाही अलनिनोच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे जिल्ह्यात १० टक्क्यांची पाणी कपात लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर विभागाच्या आठ जिल्ह्यामधील ९३१ जल साठ्यांमध्ये अवघे ३६.९४ टक्के पाणी शिल्लक असून गतवर्षी हाच पाणी साठा तब्बल ८९.०९ टक्के एवढा होता.

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या १७४ धरणांमध्ये आजपर्यंत ८१. ९८ टक्के जल साठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच दिवशी ९०. ४९ टक्के पाणी साठा शिल्लक होता. परतीच्या पावसाने पाठ फिरवली तसेच ऑक्टोबरच्या उन्हामुळे बाष्पीभवन होऊन धरणांतील पाणी साठा तब्बल ८ टक्क्यांनी घटलेला.

दुसरीकडे नागपूर क्षेत्रातील ३८७ धरणांमध्ये ५६.३६ टक्के पाणी शिल्लक असून गतवर्षी हा पाणी साठा ८६.५५ टक्के एवढा होता. अमरावती विभागातील जिल्ह्यामधील २८३ धरणांमध्ये ५२.६५ टक्के जल साठा असून गतवर्षी हाच साठा ९१.०७ टक्के होता. छत्रपती संभाजीनगर विभागाच्या जिल्ह्यामधील ९३१ जल साठ्यांमध्ये अवघे ३६.९४ टक्के पाणी शिल्लक आहे.

गतवर्षी हा पाणीसाठा तब्बल ८९.०९ टक्के एवढा होता. त्यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर या आठ जिल्ह्यातील जनतेला आगामी काळात भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

  • मुंबई, ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी बारवी धरणात ९०.९० टक्के ( गतवर्षी ९७.१४ टक्के), भातसा ८७.३० टक्के ( गतवर्षी ९४.६१ टक्के), मोडकसागर ४७.४३ टक्के ( गतवर्षी ८१.३९ टक्के ), तानसा ८०.४१ टक्के ( गतवर्षी ९७.२१ टक्के) मध्य वैतरणा ७७.९८ टक्के ( गतवर्षी ९९.५० टक्के) असा पाणीसाठा उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT