Tribal student health pudhari photo
ठाणे

Tribal student health : आदिवासी शाळांमधील १ लाख ६० हजारपैकी केवळ ६१० विद्यार्थी ॲॅनॅमिक

ॲॅनेमियामुक्तीसाठी तपासणी मोहीम; अहवालाबाबत साशंकता

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : अनुपमा गुंडे

राज्यातील आदिवासी शाळा, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय आहे. त्याच पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाच्या वतीने ॲॅनेमिया निवारण कार्यक्रमात राज्यातील आदिवासी शाळांमधील सुमारे १ लाख ६ हजार ८२२ विद्यार्थ्यांचा केलेल्या हिमोग्लोबिन तपासणी मोहिमेत केवळ ६१० मुलांमध्ये रक्ताक्षय असल्याचे आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आदिवासींची आर्थिक परिस्थिती, घरातून आणि आश्रमशाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहाराचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घेता हा तपासणी अहवालाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. ॲनेमिया मुक्तीसाठी आदिवासी विकास विभागाने सिटिझन्स फॉर चाईल्ड राईट्स या संस्थेशी केलेल्या सामंजस्य कराराद्वारे ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.

१९ जुलै ते ६ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आदिवासी विकास विभागातंर्गत येणऱ्या शासकीय, अनुदानित आणि एकलव्य मॉडेलच्या निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांची रक्तक्षयाची चाचणी करण्यात आली.

नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या प्रशासकीय विभागातील २५४ शाळांमधील सुमारे १ लाख ६ हजार ८२२ विद्यार्थ्यांच्या केलेल्या तपासणीत केवळ ६१० विद्यार्थ्यांमध्ये रक्ताक्षय आढळून आला.

आमच्या संस्थेने नुकत्याच डहाणू तालुक्यातील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांच्या केलेल्या हिमग्लोबिन तपासणी चाचणीत ९० टक्के विद्यार्थी ॲनेमिक असल्याचे आढळून आले. आदिवासी भागात नाचणीयुक्त पदार्थामधून शरीरात लोह मिळते; परंतु रक्तातील लोहाचे प्रमाण असण्यासाठी मांसाहार किंवा लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. लोखंडी भांड्यात स्वयंपाक केला तरी शरीराला लोह मिळू शकते; परंतु आदिवासी भागात मांसाहार करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तसेच लोखंडी भांड्याचा वापरही होत नाही, लिंबूवर्गीय फळे त्यांना मिळतातच असे नाही, त्यामुळे आदिवासी भागात प्रत्येकाचे हिमोग्लोबिन चांगले असेलच असे नाही. मी गेली १५ ते १८ वर्षे आदिवासी भागात काम करते आहे, त्यामुळे मला आदिवासींची आहार पद्धती माहिती आहे. त्यामुळे ॲनेमियासहच ती जगत असतात. लवकर गरोदरपणा, आहाराच्या कमतरतेमुळे मुलींमध्ये ॲनेमिक असण्याचे प्रमाण आधिक असते, त्यामुळे प्रत्येकाचे हिमोग्लोबिन १२ ते १५ च्या वर आहे, असा निष्कर्ष निघणे आश्चर्यकारक आहे.
श्रध्दा शृंगारपुरे - दिगंत स्वराज्य फाऊंडेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT