ठाणे : अनुपमा गुंडे
आर्केस्टा, डी. जे सोबतच तमाशावर होत असलेल्या पाश्चात्य आक्रमणातही महाराष्ट्रातील अगग्रण्य लोककला जीवंत ठेवण्याची धडपड करणार्या तमाशा फडाच्या सुपार्यांना दुष्काळाची झळ बसली आहे. खान्देशात सुरू झालेल्या यात्रांमध्ये आणि आगामी चार महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात होवू घातलेल्या यात्रा-जत्रांसाठी तमाशाच्या सुपार्यांचा दर निम्याने खाली उतरल्याने फड कसे जगवायचे असा प्रश्न मालकांकडे उभा आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातील गावा गावांमध्ये जत्रांची मोठी परंपरा आजही आहे. या यात्रांमध्ये गावाच्या कुलदैवताच्या पूजेइतकेच महत्व गावात जत्रे दरम्यान होणार्या तमाशालाही दिले जाते, त्यामुळे बदलत्या काळाच्या वेगातही तमाशा कला जीवंत ठेवण्यात या जत्रांचा मोठा वाटा आहे. मात्र जेव्हा - जेव्हा दुष्काळाची झळ महाराष्ट्राला जाणवते, त्याचा असर या जत्रेतील तमाशावर होतो.
यंदा महाराष्ट्रातील सुमारे 300 हून अधिक तालुक्यात मध्ये दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दसऱ्यानंतर खान्देशात सुरू झालेल्या जत्रांसाठी आलेल्या सुपार्यांचा दर दरवर्षीपेक्षा 50 टक्क्यांनी कमी असल्याचे सुनंदा कोचुरे धुळेकर लोकनाट्य मंडळ (धुळे) शेषराव गोपाळ धुळे यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना सांगितले.
बहुतांशी गावांमध्ये लोकवर्गणीतून गावची जत्रा साजरी केली जाते, यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातच पैसा नसल्याने सुपार्यांचा दर उतरला आहेच, पण जत्रा काळात 20 -25 सुपार्या मिळायच्या, त्यामुळे यंदा त्या सुपार्यांची संख्याही 10 -15 ने घटली असल्याची व्यथा धुळे यांनी सांगितली.
फडमालकांची शासनाकडे मदतीची मागणी
महाराष्ट्रात आजचा घडीला हलगी - ढोलकीने सादर होणारे पारंपरिक 130 तमाशा फड आहेत. त्यात सुमारे 56 हजाराच्या कलावंतांची गुजराण या कलेवर आहे. दुष्काळामुळे आणि इतरही आक्रमणामुळे या पारंपारिक तमाशा फडांना येत असलेल्या अडचणींचा विचार करून राज्य शासनाने शेतकर्याप्रमाणे तमाशा कलावंतांनाही मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तमाशा फड मालकांच्या संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.
कसे चालते तमाशा फडाचे अर्थकारण?
तमाशा फडाचे अर्थकारण सांगताना कै. चंद्रकांत भिसे पाटील निभोंरेकर फडाचे आनंद कुमार भिसे पाटील निभोंरकर म्हणाले, एका फडात 60 पासून पुढे कलाकार असतात.हा फड चालविण्यासाठी या कलाकारांना मालकाला पगार द्यावा लागतो. बॅंका आम्हांला दारात उभ करत नसल्याने आम्ही खासगी सावकारांकडून 5 टक्के व्याजाने कर्ज घेतो. तमाशातील नर्तक - नर्तिकाच्या जोड्यांना, वादकांना आम्ही उचल देतो.
पश्चिम महाराष्ट्रात साधारणतः होळी ते बुध्द पौर्णिमे दरम्यान जत्रांच्या सुपार्या मिळतात. यंदा दुष्काळामुळे सुपार्यांचे रेट घसरले तर नेहमीच्या ठिकाणी येणारे बोलावणे पण दुष्काळामुळे येते की नाही, अशी परिस्थिती आहे. एका तमाशामागे 90 हजार ते 1 लाखाच्या घरात सुपारी मिळते. ते दर आता 40 - 50 हजारावर आले आहेत.
या जत्रांच्या काळात फड मालकाला 20 ते 22 लाखाच्या घरात उत्पन्न मिळत असले तरी फडातील सामानाची डागडुजी, बसचा खर्च, कामगारांचे पगार, कलावंतांचे मानधन जाऊन हातात 2 ते 3 लाख पडतात. पण यंदा या दुष्काळाची झळ शेतकर्यांप्रमाणे आम्हांलाही सोसावी लागणार असे दिसते, अशी भीती आनंद कुमार भिसे पाटील निभोंरकर यांनी व्यक्त केली.