School Traffic Safety Teams Pudhari
ठाणे

School Traffic Safety Teams: वाहतूक सुरक्षेची शाळेतूनच सुरुवात; शिक्षकांसाठी कार्यशाळा

ठाणे पोलीस आणि शिक्षण विभागाचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: वाढत्या वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभाग (गृह खाते) व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ‌‘रस्ता वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण पथक‌’ स्थापन करण्याच्या उद्देशाने ठाणे विभागातील शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 22 एप्रिल 2026 दरम्यान ठाणे येथील वाहतूक नियंत्रण कक्षात आयोजित या उपक्रमामुळे वाहतूक सुरक्षेच्या जनजागृतीस बळ मिळणार आहे.

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि शिक्षण विभाग यांच्या पुढाकारातून ‌‘रस्ता सुरक्षा व आपतकालीन व्यवस्थापन‌’ शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे विभागातील प्रत्येक शाळेतून किमान एक शिक्षक या कार्यशाळेत सहभागी होणार आहे. या विशेष प्रशिक्षणात सकाळी आणि सायंकाळी मैदानावर परेड, वाहतूक नियमन, तसेच अंतर्गत सत्रांमधून आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार, अग्निशमन यांचे सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पोलीस उपआयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागीय समन्वय अधिकारी दिलीप स्वामी व मनिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर पार पडणार आहे. प्रशिक्षणादरम्यान सहभागींसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी सर्व शाळांना आवाहन करताना सांगितले की, “प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण पथक कार्यरत होणे अत्यावश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे भान निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.”120 शाळांमधून शिक्षक सहभागी होणार आहेत.

वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता असते. तेव्हा, अशा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक नियंत्रण, पथ कवायत, अग्निशमन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापन यांचे सखोल शिक्षण व प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, नेतृत्वगुण, सेवाभावी वृत्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव दृढ होते. शिक्षक व प्रशिक्षित विद्यार्थी यांच्या संयुक्त सहभागातून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह, विविध राष्ट्रीय सोहळे, धार्मिक सण व स्थानिक उत्सवांमध्ये सक्रिय योगदान घेण्यात येणार आहे.
- पंकज शिरसाट, वाहतूक उपायुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT