इलियास ढोकले
नाते: ग्रामीण भागात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पाणवठ्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची गरज अधिक तीव्रतेने पुढे येत आहे. विहिरी, तलाव, ओढे, पाझर तलाव, बांधारे यांसारख्या जुन्या जलस्रोतांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने अनेक ठिकाणी ते गाळाने भरले, अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले किंवा पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
परिणामी, पावसाळ्यानंतर काही महिन्यांतच ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यातील अनेक दुष्काळप्रवण भागांमध्ये ही समस्या गंभीर बनली आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून नवीन
पाणीपुरवठा योजना राबवण्यात येतात; मात्र जुन्या, स्थानिक आणि नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, अशी टीका जलतज्ज्ञांकडून केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, पाणवठ्यांचे संवर्धन केल्यास पावसाच्या पाण्याचे नैसर्गिक पुनर्भरण (रीचार्ज) होऊन भूजलसाठा वाढण्यास मोठी मदत होऊ शकते. यासाठी गाळ काढणे, अतिक्रमण हटवणे, पाण्याच्या वहनमार्गांची दुरुस्ती आणि परिसर हरित करणे या उपाययोजना तातडीने राबवणे आवश्यक आहे.
दरम्यान, सरकारकडून राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियान सारख्या योजनांनी काही प्रमाणात सकारात्मक परिणाम घडवून आणले असले, तरी त्याची सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि स्थानिक पातळीवरील सहभाग अजूनही अपुरा असल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी केवळ नव्या योजना राबवणे पुरेसे नसून, पारंपरिक जलस्रोतांचे जतन आणि पुनरुज्जीवन यावर भर देणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे. अन्यथा येणाऱ्या काळात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सामुहिक स्वच्छता मोहीम
पूर्वी गावागावांत सामुदायिक सहभागातून पाणवठ्यांची स्वच्छता, दुरुस्ती आणि देखभाल नियमितपणे केली जात होती. त्यामुळे पावसाचे पाणी साठवले जाऊन वर्षभरासाठी पाण्याची उपलब्धता राखली जात होती. आज मात्र या परंपरा लोप पावत चालल्याने भूजलपातळी झपाट्याने खाली जात आहे आणि विहिरी कोरड्या पडत आहेत.