काम नाही, मजुरी नाही, भूक मात्र रोजची; पोटाची खळगी भरायची कशी ? pudhari photo
ठाणे

Rural migrant workers : काम नाही, मजुरी नाही, भूक मात्र रोजची; पोटाची खळगी भरायची कशी ?

रोजगाराच्या शोधात ग्रामीण मजुरांची धाव शहराकडे अन्‌‍ तांडा चालला रे गड्या तांडा चालला

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली शहर : संस्कृती शेलार

गावात काम नाही, मजुरी नाही आणि भूक मात्र रोजची! म्हणूनच कुडकुडत्या थंडीतही ग्रामीण मजुरांची ‌‘पोटासाठीची धडपड‌’ थांबण्याचे नाव घेत नाही. मराठवाडा, विदर्भ, तसेच पालघरवरील कातकरी, आदिवासी तसेच इतर मजूर कुटुंबांची पुन्हा मोठ्या प्रमाणावर शहरांकडे ढकलली जाणारी चळवळ सुरूच आहे.

स्थानिक भागात भातकापणीसारखी हंगामी कामे सुरू असली, तरी त्या कामांमधून मिळणारी मजुरी मात्र अत्यल्पच. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास ती अपुरी ठरते. त्यामानाने शहरांमधील मजुरी तुलनेने जास्त असल्याने अनेक मजूर रोजगाराच्या शोधात डोंबिवली, ठाणे, भिवंडी, बोईसरसारख्या परिसरात स्थलांतर करतात.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कातकरी समाजातील शेकडो कुटुंबांपैकी बहुसंख्य मजूर दरवर्षी याच स्थलांतराच्या चक्रातून जातात. कचरा वेचणे, गवंडी, वीटभट्ट्या, बांधकाम, रंगकाम, रस्ते बांधणी आणि इतर हातमजुरीची कामे हाच त्यांच्या जगण्याचा आधार. काहींना तर वीटभट्टी मालकांकडून घेतलेल्या आगाऊ रकमेच्या बदल्यात मेपर्यंत कामाला बांधील राहावे लागते.

ग्रामीण भागातील रोजगाराची कमतरता अजूनही आहेे. सरकारी योजना कागदावर रंगतात, पण लाभार्थ्यांच्या हातात मात्र त्या पोहोचतात का? हा मोठाच प्रश्न आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेले स्थलांतराचे चक्र आजही बदललेले नाही. पोटासाठीची ही भटकंती कधी थांबणार? याचं उत्तर मात्र अद्याप धूसरच आहे.

बालपण भटकंतीत हरवलं, शिक्षणाची वही कोण उचलणार?

स्थलांतराचा सर्वाधिक फटका बसतो तो या मजूर कुटुंबांतील मुलांना. वारंवारची स्थलांतरं, राहणीमानातील अस्थिरता आणि तात्पुरत्या वास्तवामुळे त्यांचे शिक्षण अक्षरशः अधांतरी राहते. ‌‘प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार‌’ असा बुलंद नारा असला, तरी या मजूर मुलांचे वास्तव वेगळेच चित्र दाखवते. शाळा, पाठ्यपुस्तके, सातत्यपूर्ण शिक्षण यापैकी काहीही त्यांच्या वाट्याला पुरेसं येत नाही. कित्येक मुलांना लहान वयातच घरोघरी भटकंती आणि मजुरीची चव चाखावी लागते.

पोटासाठी कष्ट तर घ्यावेच लागतात ना?

डोंबिवलीत आलेल्या तात्पुरत्या वास्तव्यास असलेल्या मिनाबाई ढोबळे आपल्या परिस्थितीचे चित्र शब्दांत मांडतात. त्या म्हणतात, “ऑक्टोबरपासून आम्ही इथे आलो आहोत. मी काम करते, माझा मुलगाही काम करतो, बाजूची मावशी कचरा वेचते. मिळेल ती मजुरी करूनच आम्ही आमचं पोट भरतो. मराठवाड्यातून मी माझ्या कुटुंबाला घेऊन इथपर्यंत आलेली आहे. आमचा प्रवास मोठा मावळच्या डोंगर-दऱ्या चालत ओलांडून इथपर्यंत पोहोचतो. पोटासाठी एवढं करावंच लागतं. पावसाळा येईपर्यंत आम्ही इथेच राहणार आहोत.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT