Maharashtra Politics |  File Photo
ठाणे

Maharashtra Politics : अधिकाऱ्यांचे राजकीय कनेक्शन ठरणार तपास यंत्रणेला डोकेदुखी?

तक्रारीमध्ये नावे असूनही पाटोळेंचे वसुली एजंट मोकाटच

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : प्रवीण सोनावणे

ठाणे महापालिकेचे लाचखोर माजी उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर त्यांची सध्या जामिनावर सुटका देखील करण्यात आली आहे. पालिकेच्या एका मोठ्या अधिकाऱ्यावर अशाप्रकारची पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली असली तरी, अधिकाऱ्यांच्या असलेल्या राजकीय कनेक्शनमुळेच त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, असे वारंवार आरोप यापूर्वी देखील झाले आहेत. शंकर पाटोळे यांच्या प्रकरणातही राजकीय कनेक्शन समोर आले आहेत. मात्र हेच राजकीय कनेक्शन तपास यंत्रणेची डोकेदुखी ठरू शकतात, हे यापूर्वीच्या अनुभवावरूनही निदर्शनास आले आहे. त्यामुळेच पाटोळेंना अटक झाली असली तरी त्यांचे वसुली एजंट ज्यांचा नावाचा तक्रारीमध्ये उल्लेख असताना ते अद्याप मोकाटच असून यांच्या मुसक्या तपास यंत्रणा कधी आवळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी एका विकासकाकडून लाच घेतल्याप्रकरणी ठाणे महापालिकेचे माजी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह दोघांना मुंबई लाचलुचपत विभागाकडून अटक करण्यात आली होती. ही कारवाई ठाणे लाचलुचपत विभागाने न करता मुंबई लाचलुचपत विभागाने केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. ठाणे महापालिकेचे केवळ शंकर पाटोळे हे एकमेव भ्रष्ट अधिकारी नसून पडद्यामागे आणखी काही अधिकारी देखील असल्याची चर्चा आहे.

शंकर पाटोळे यांनी ठाण्यातल्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांबरोबर आपलं साटंलोटं जपताना स्वतःचं मेतकूट अशा पद्धतीत तयार केलं होतं, त्यामुळे पाटोळे यांना वाचवण्यासाठी एक अदृश्य स्वरूपात यंत्रणा काम करत असून विशेष करून राजकीय मंडळी यामध्ये आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. शंकर पाटोळे यांना जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा अनेकांचे धाबे दणाणले होते. पाटोळे आतमध्येच राहिले, तर आपली मोठी अडचण होईल, हे काही लोकांना वाटले असावे यासाठी त्यांना वाचवण्यासाठी अनेकांचा आटापिटा चालला होता, अशी चर्चा देखील खासगीमध्ये सुरू होती. पाटोळे यांच्या प्रकरणानंतर या अधिकाऱ्यांच्या मागे ठाण्यातील एक राजकीय व्यवस्था काम करते हे अधोरेखित झाले असून काही दिवसांपूर्वीच पालिकेचे माजी अधिकारी महेश आहेर यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपमध्ये तर अनेक सत्ताधारी नगरसेवकांची नावे देखील या अधिकाऱ्याने आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये घेतली होती. येणारी ठाणे महापालिकेची निवडणूक खूपच चर्चेची निवडणूक असणार आहे. कारण विरोधकांकडून हा मुद्दा उचलण्याची दाट शक्यता आहे. त्यामळे इथल्या राजकीय व्यवस्थेला हा मुद्दे जड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात गेल्या आठवड्यात मंदार गावडे आणि संदीप पावसकर यांना ठाणे लाचलुचपत विभागाने अटक केली.

मंदार गावडे हा ठाण्यातील राबोडी येथे शिवसेनेचा शाखाप्रमुख असून तीन वर्षांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गावडे याला या पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले होते. केवळ मंदार गावडेच नाही, तर आणखी काही राजकीय मंडळीचा सहभाग या प्रकरणात असण्याची शक्यता असून तपास यंत्रणांनी पारदर्शकपणे तपास केला, तर हे सर्व शक्य आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या असलेल्या राजकीय कनेक्शनमुळे तपास यंत्रणांना हे किती शक्य होईल, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

संतोष तोडकरवर आशीर्वाद कोणाचा ?

मंदार गावडे आणि सुशांत सुर्वे या दोघांनी तक्रारदाराची संतोष तोडकर याच्याशी भेट घालून दिली होती. त्यावेळी पाटोळे यांनी दुकानांवर कारवाई करण्यासाठी २० लाखांची लाच द्यावी लागेल, असा आकडा कागदावर लिहून दिला होता. तसेच तक्रारदाराने संतोष तोडकर याची भेट घेतली असता त्याने या कारवाईसाठी दहा लाख रुपये सुशांत सुर्वे याच्या बँक खात्यावर पाठवण्यास सांगितल्याचे तक्रारदाराने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. हा तोडकर देखील ठाण्यातील कळवा - विटावा भागात शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय असल्याचे समोर आले आहे. तीन वर्षांपूर्वी कळव्यात एका जाहीर कार्यक्रमात संतोष तोडकर याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत तोडकर याने शिवसेनेत प्रवेश केला होता. तक्रारीमध्ये नाव असूनही तपास यंत्रणा यांच्यापर्यंत पोचलेली नाही. अनधिकृत बांधकामप्रकरणात तोडकर याच्या नावाची सुरुवातीपासूनच चर्चा आहे. पाटोळे यांच्या प्रकरणात आता थेट नाव समोर आल्याने अनधिकृत बांधकामांमध्ये तोडकर याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. मात्र मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT