Pratap Sarnaik file photo
ठाणे

Illegal Cattle Transport: गोमातेची अवैध वाहतुक केल्यास कठोर गुन्हे, वाहने जप्त; सरनाईक यांचा इशारा

तस्करी, कत्तल खपवून घेतली जणार नाही

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर: आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने व जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. गोमातेची तस्करी व कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सीमा तपासणी नाके व सर्व वाहतूक यंत्रणेला 25 ते 28 मे या कालावधीत गोमातेची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याविरोधात युद्धपातळीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून राज्याने देशी गाईला राज्यमातेचा सन्मान दिला आहे. हिंदू समाजात गोमाता हा श्रद्धेचा आणि संस्कृतीचा विषय आहे. अशा पवित्र गोमातेची कत्तल करून तिची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता कायद्याचा कठोर धडा शिकविला जाणार आहे.

विशिष्ट धर्मातील सणांच्या कालावधीत गोमातेची तस्करी वाढते, गोवंशीय जनावरांना कोंबून, उपाशी ठेवून, अमानुष पद्धतीने वाहनांमध्ये भरले जाते. हा केवळ कायद्याचा भंग नसून हिंदू समाजाच्या श्रद्धांवर घाला असल्याची तीव्र भावना सरनाईक यांनी व्यक्त केली. अशा गोतस्करांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा त्यांनी आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दिला आहे.

राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

जनावरांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाणार असून, आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे आणि प्राणी कल्याण नियमांचे पालन झाले आहे का, याची पाहणी तपासणीदरम्यान केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.

मोटार वाहन कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा व केंद्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची वाहने थेट जप्त करण्यात येतील. या मोहिमेत परिवहन विभागासोबत स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग, विविध गो सेवा व प्राणी कल्याण संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT