

सुरेश साळवे
ठाणे: ठाणे ग्रामीण पोलिस दलातील अनेक गुन्ह्यांची उकल करणारी, पोलिसांची विश्वासू सहकारी आणि श्वान पथकातील धाडसी डॉबरमन जातीची ‘बेली’ रविवारी काळाच्या पडद्याआड गेली. तब्बल नऊ वर्षे पोलिस दलात निष्ठेने सेवा बजावल्यानंतर बेलीने अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण पोलिस दल हळहळले.
सोमवारी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील बीडीडीएस मैदानात बेलीला अत्यंत भावनिक वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. ठाणे ग्रामीणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नीलम वाव्हळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेलीच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी पोलिसांकडून फैरींची सलामी देत या शूर श्वानाला मानवंदना देण्यात आली. अनेक गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणारी बेली केवळ श्वान नव्हती, तर पोलिस दलातील प्रत्येकासाठी ती कुटुंबातील सदस्यासारखी होती.
पडघा, शहापूर, मुरबाड परिसरात अनेक बंद घरांमध्ये झालेल्या घरफोड्यांचा तपास लावण्यात बेलीची मदत घेतली होती. रात्रीच्या अंधारातील दरोड्यांच्या गुन्हांची उकल होत असे. महामार्गाच्या कडेला किंवा जंगलाने वेढलेल्या ग्रामीण भागात होणाऱ्या दरोड्यांच्या घटनांमध्ये आरोपी पळून जाण्यात यशस्वी व्हायचे.
अशा वेळी बेली जंगलातील आणि दुर्गम भागातील वाटेवरून अचूक माग काढत दरोडेखोरांनी लपवलेला मुद्देमाल किंवा त्यांनी आश्रय घेतलेली ठिकाणे शोधून काढायची. बेलीने 14 गंभीर गुन्ह्यांच्या उकल तसेच शेकडो प्रकरणात तपासाची दिशा दाखवली होती.
बेलीचे हँडलर्स दिघे आणि पठाण यांच्यासाठी हा क्षण अत्यंत वेदनादायी ठरला. जिच्यासोबत दिवस-रात्र घालवले, जिच्यावर लेकरासारखे प्रेम केले, त्या बेलीला अखेरचा निरोप देताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले होते. अंत्यसंस्काराच्या वेळी वातावरणात एक वेगळाच शोक दाटून आला होता.
खडावली मर्डर मिस्ट्री (सर्वात मोठी कामगिरी)
भातसा नदीजवळ राजेश प्रभूळकर या व्यक्तीचा चेहरा दगडाने ठेचून अत्यंत निर्घृण खून करण्यात आला होता. पोलिसांकडे संशयिताचा कोणताही सुगावा नव्हता. घटनास्थळावर सापडलेल्या पुराव्यांचा वास घेत बेलीने थेट खडावली रेल्वे स्टेशनपर्यंतचा मार्ग पोलिसांना दाखवला. परिणाम: यामुळे पोलिसांचा तपासाचा परीघ निश्चित झाला.
स्टेशन परिसरातील 150 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि 80 हून अधिक बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासून पोलिसांनी मुंबईच्या लोअर परेलमधून एका कुप्रसिद्ध सीरियल क्रिमिनलला बेड्या ठोकल्या. हा खून पैशांच्या वादातून झाल्याचे समोर आले.