शिवसेनेच्या चिमण्यांना खुणावतेय ‌‘मातोश्री‌’चे घरटे file photo
ठाणे

BJP vs Shinde Shiv Sena : शिवसेनेच्या चिमण्यांना खुणावतेय ‌‘मातोश्री‌’चे घरटे

भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी; छापासत्र, गुन्हे दाखल होत असल्याने सेना आमदार अस्वस्थ

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : 267 नगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना अशा जोरदार रंगलेल्या निवडणुका, शिंदे सेनेच्या नेत्यांवर दाखल झालेले गुन्हे आणि शिवसेनेच्या मंत्री भरत गोगावले, आमदार निलेश राणे, संतोष बांगर, शहाजी बापू पाटील यांनी मनातील व्यक्त केलेली खदखद, कणकवलीत ठाकरे सेना-शिंदे सेना एकत्र लढल्याने तयार झालेले नवे समीकरण या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी, या चिमण्यांनो परत फिरा रे... अशी दिलेली हाक आठवू लागली आहे आणि चिमण्यांना ‌‘मातोश्री‌’ खुणावू लागली आहे.

मंगळवारी नगरपालिका निवडणुकांच्या वेळी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले विरुद्ध राष्ट्रवादीच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्यात रंगलेले वाक्‌‍युद्ध, विकास गोगावलेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे दाखवलेले पिस्तूल आणि त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा या साऱ्यांमुळे भरत गोगावले अस्वस्थ झाले आणि आमचे मातोश्रीशी संबंध आजही कायम असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्याचबरोबर संबंध असणे यात गैर काय, असा प्रतिसवालही पत्रकारांना केल्याने मातोश्रीच्या आठवणीचे संकेत त्यांनी दिले आहेत.

भाजप आपल्यावर अन्याय करते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये भाजपशी फारकत घेत महाविकास आघाडीचा रस्ता धरला होता. त्यावेळी अडीच वर्षांच्या सरकारनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उभी फूट पडली आणि पक्षचिन्हासह शिवसेनेचे 50 आमदार बाहेर पडले आणि भाजपबरोबर घरोबा केला. त्याच शिंदेंच्या शिवसेनेला आपली राजकीय कोंडी होत असल्याचे वाटू लागले आहे.

याबाबतची पहिली खदखद व्यक्त केली ती शिंदे शिवसेनेचे मालवणचे आमदार निलेश राणे यांनी. कोकणात खासदार नारायण राणेंना डावलून भाजपचे प्रदेशाध्यक्ष काम करत असल्याचा त्यांचा थेट आरोप आहे. त्यांनी भाजपची निवडणुकीसाठी आणलेली रोख रक्कम पकडून दिली. पण, भाजप नेत्यांनी ती व्यवसायातील असल्याचे सांगितले आणि उलट निलेश राणेंवरच गुन्हा दाखल झाला. त्यानंतर निलेश राणे यांनी दुसऱ्या दिवशी मध्यरात्री रोख रक्कम घेऊन जाणारी कार पकडली. त्यानंतर ते पोलीस स्थानकात गेले. पण तेथेही रक्कम बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नाही, असा त्यांचा आरोप आहे.

महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते पिस्तूल घेऊन आपल्यावर हल्ला करण्यासाठी आले. आमच्या कार्यकर्त्यांनी हे पिस्तूल खेचून घेतले. ते त्यांनी थेट पत्रकारांना दाखवले. पण गुन्हा विकास गोगावलेंवरच दाखल झाला, असा शिवसेना शिंदे गटाचा आरोप आहे.

सांगोल्याचे शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयाची झाडाझडती झाली. त्याआधी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवला गेला. या चारही प्रकरणांमध्ये शिवसेना शिंदे गट टार्गेट झाल्याचे त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत खदखद आणि मातोश्रीची आठवण या सर्वांना येत असल्याचे हे नेते सांगू लागले आहेत.

महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची होणारी कोंडी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणारे झुकते माप, भाजपकडून राज्यात दिला गेलेला शत-प्रतिशतचा नारा, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आक्रमक नेतृत्व या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतही अस्वस्थतेचा प्रवाह पुढे जाऊ लागला आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीत सुरू झालेला संघर्ष महापालिका निवडणुकीत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे उपविभागप्रमुख आबा मोरे आपल्या 200 कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल झाल्याने परतीच्या प्रवासाची चर्चा आणि राज्यात होणारी कोंडी हे विषय पुन्हा एकदा चर्चेला आले आहेत.

शिंदेंच्या मतदार संघातील कार्यकर्ते ठाकरेंकडे परतले

दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी मतदारसंघातील शंभरपेक्षा जास्त कार्यकर्ते माघारी परतल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी, स्वाभिमान गहाण टाकून भाजपची फटके खाणारी संघटना बरी की, स्वाभिमानाने जगणारी बरी, ते तुम्ही ठरवा, अशी साद शिवसैनिकांना घातली आहे. कणकवलीत ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र आली तेव्हा दोन्ही बाजूकडून मूक संमती मिळाली. त्यामुळे हा पॅटर्न राज्यात अन्यत्रही पुढे येऊ लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT