Mahad LPG Cylinder OTP Issue Pudhari
ठाणे

Mahad LPG Cylinder OTP Issue: सिलिंडर ओटीपी सक्तीने ग्राहक गॅसवर

ग्रामीण भागामध्ये नेटवर्कचा व्यत्यय, बुकिंग अडकली,गॅस एजन्सीकडून अडवणूक

पुढारी वृत्तसेवा

खाडीपट्टा: केंद्र सरकारने गॅस सिलेंडर वितरणात सुरक्षिततेसाठी लागू केलेल्या ओटीपी सक्तीमुळे महाड तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भाग असलेल्या खाडीपट्टयातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे बुकिंगचा ओटीपीच वेळेवर मिळत नसल्याने येथील शेकडो कुटुंबांचे स्वयंपाकाचे हाल होत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून गॅस कंपन्यांनी डिलिव्हरीच्या वेळी मोबाईलवर आलेल्या ओटीपीशिवाय सिलेंडर देणार नाही अशी सक्ती केली आहे. मात्र महाड तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या खाडीपट्टा हा मोबाईल नेटवर्कच्या दृष्टीने "नो नेटवर्क झोन" असल्यासारखी अवस्था असून या ठिकाणी बऱ्याचदा मोबाईल नेटवर्क नॉट रिचेबल असते.

तसेच वीज वितरणचा खेळ खंडोबा देखील याठिकाणी नेहमीचाच सुरू असतो. पर्यायाने मोबाईल नेटवर्क गायब झाल्यामुळे ओटीपी प्राप्त होणे मुश्किल होत आहे.

नागरिकांनी सिलेंडर बुकिंग केली की ओटीपी येण्यासाठी तासंतास वाट पहावी लागते. काही वेळा ओटीपी येतच नाही. त्यामुळे बुकिंग कॅन्सल होते. पुन्हा नव्याने बुकिंग करावी लागते. अनेक वृद्ध आणि महिला मोबाईल नेटवर्क ठिकाण शोधत आहेत.

याचा परिणाम मात्र वेळ आणि पैशाचा अपव्यय होत असून ओटीपीसाठी 2-3 वेळा पुन्हा, पुन्हा गॅस सिलेंडर बुकिंग करावे लागत आहे, मात्र ओटीपी ची वाट पाहत रहावे लागत आहे.

सिलेंडर बुकींग झाला असल्याचे ओटीपी येत नसल्याकारणाने सिलेंडर मिळत नाही त्यामुळे आता पुन्हा चुलीवर परतावे लागले आहे. अनेक घरांमध्ये पुन्हा लाकूड, शेणाच्या गोवऱ्या वापरण्याची वेळ आली आहे.

स्थानिकांनी प्रशासन आणि गॅस कंपन्यांकडे मागणी केली आहे की, नो नेटवर्क झोनसाठी ओटीपीमधून सूट द्यावी किंवा पर्यायी "आधार बायोमेट्रिक" पडताळणीची सुविधा द्यावी. अशी मागणी आता जोर धरत आहे.

दरम्यान, खाडीपट्टयात बीएसएनएल कंपनीचे मोबाईल टॉवर आहे तसेच इतर खाजगी कंपनीचे देखील टावर आहेत. मात्र कित्येक वेळेस मोबाईल नेटवर्क नॉट रीचेबल होत असल्याकारणाने त्याचबरोबर बीएसएनएल कंपनीचे टावर तर गेले अनेक दिवस पूर्णपणे बंद पडलेले आहे.

त्यामुळे मोबाईल नेटवर्कच्या अभावी ओटीपी मेसेज येण्यासाठी विलंब होत आहे अथवा तो प्राप्त करण्यासाठी वारंवार नेटवर्क मध्ये जावे लागत आहे. त्यामुळे गॅस डिलिव्हरी बॉयला मॅन्युअल पडताळणीची परवानगी द्यावी. अशी देखील स्थानिक स्तरावर मागणी होत आहे.

पर्यायी सुविधा देण्याची मागणी

खाडीपट्टयातील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, "आम्हाला सुरक्षितता हवी आहे, पण त्यासाठी पर्यायी व्यवस्था हवी. नेटवर्क नसलेल्या भागात ओटीपी सक्ती म्हणजे आम्हाला गॅसच नाकारल्यासारखे आहे. गॅस एजन्सी १५ कि.मी. लांब आहे. गॅस एजन्सीची गाडी वेळच्या वेळेवर गावी येत आहे, मात्र सिलेंडर बुकिंग केलेले असताना ओटीपी प्राप्त न झाल्यामुळे सिलेंडर मिळत नाही त्यामुळे गॅसधारकांचे मोठे हाल झाले आहेत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT