ठाणे : फुफ्फुसाचा कर्करोग केवळ धूम्रपान करणाऱ्यांमध्येच होतो, हा समज आता चुकीचा ठरत आहे. पर्यावरणीय कारणांमुळे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्येही या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
वायू प्रदूषण, घरगुती धूर, रेडॉन वायूचा संपर्क आणि आनुवंशिक घटक हे धोकादायक ठरत असून, ठाणे, मुंबईत दरवर्षी शेकडो अशा रुग्णांवर उपचार सुरू असतात.
देशात दरवर्षी जवळपास 75 हजार फुफ्फुस कर्करोगाचे रुग्ण आढळतात. यापैकी 30-40 टक्के रुग्ण हे धूम्रपान न करणारे असतात. ‘पॅसिव्ह स्मोकिंग’, म्हणजे दुसऱ्याच्या धुराचा संपर्क, हवेतील घातक सूक्ष्मकण, कारखान्यांमधील घातक रसायनांचा संपर्क आणि जनुकीय बदलांमुळेही हा आजार होऊ शकतो. रेडॉन या गंधहीन, अदृश्य आणि नैसर्गिक किरणोत्सर्गी वायूमुळे सुद्धा फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी प्रमुख जबाबदार घटक मानला जातो. काही अभ्यासांनुसार, फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 6 टक्के -14 टक्के मृत्यू रेडॉनमुळे होतात.
याशिवाय बांधकाम, खाणकाम, वेल्डिंग, डिझेल वापर अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्येही हा धोका अधिक असतो. रेडॉन वायूचा संपर्क तळमजल्यांमध्ये अधिक असतो, त्यामुळे अशी घरे किंवा कार्यालये धोकादायक ठरू शकतात. फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला सामान्य वाटू शकतात. जसे की खोकला, छातीत दुखणे, थकवा, वजन कमी होणे. मात्र हे दीर्घकाळ राहिल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
पॅसिव्ह स्मोकिंग
वायू प्रदूषण
रेडॉन वायू
कामाच्या ठिकाणी आर्सेनिक, सिलिका, डिझेलचा धूर
आनुवंशिकता
नियमित आरोग्य तपासणी गरजेची
डॉक्टरांच्या मते, प्रत्येकाने ही लक्षणे ओळखून वेळेवर निदान करणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी 100 हून अधिक नॉन-स्मोकर रुग्णांवर उपचार होतात. एका अहवालानुसार, गेल्या वर्षभरात आरोग्य केंद्रात उपचार घेतलेल्या 1,300 रुग्णांपैकी 8 टक्के रुग्ण हे कधीही सिगारेट न ओढलेले होते. म्हणूनच, धूम्रपान न करताही कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी जनजागृती आणि नियमित आरोग्य तपासणी गरजेची आहे.
तीन आठवड्यांहून अधिक काळ खोकला
खोकताना रक्त येणे
छातीत, खांद्यावर, पाठीत दुखणे
श्वास घेताना त्रास, थकवा
वजनात अचानक घट, भूक मंदावणे
वारंवार होणारा न्यूमोनिया किंवा इन्फेक्शन
आवाजात बदल, आवाज बसणे
बोटांच्या टोकाचा आकार बदलणे