ठाणे : मागील आठवड्यात मिरा, भाईंदर येथे बिबट्याने दर्शन देऊन नागरिकांची भंबेरी उडवून दिली असतानाच गुरुवारी नाताळाच्या दिवशी ठाण्याच्या पोखरण रोड-2 येथील एका बंद कंपनीच्या आवारात बिबट्याने अस्तित्व दाखविल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. तर वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी ठाण मांडून बसले आहेत. तर बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
ठाण्याच्या पोखरण रोडवर असलेल्या कॉसमॉस गृहसंकुलासमोर बंद कंपनी आहे. तर आसपास झाडांचे जंगल आहे. याच झाडांमध्ये बिबट्याचे दर्शन झाले. गृहसंकुलात स्थानिक नागरिकांनी त्याचा व्हिडीओ काढला आणि तो व्हायरल झाला.
वनविभागाला आणि पोलिसांना माहिती दिली. त्वरित घटनास्थळी वनविभाग आणि स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी भेट दिली. मात्र बिबट्या आढळून आलेला नाही. गृहसंकुले, इमारती, शाळा, रुग्णालयाच्या परिसरामागे असलेल्या काहीशा झाडांच्या गर्दीत या बिबट्याने दर्शन दिल्याने आणि गुरुवारी अनेक तास तपास केल्यानंतरही बिबट्या न सापडल्याने वनविभागाने या परिसराच्या आसपास असलेल्या गृहसंकुले, शाळा, रुग्णालये यांच्या सुरक्षा रक्षकांना बिबट्या पुन्हा दिसल्यास करावयाच्या उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले. या परिसराची पाहणीही केली.
चार ड्रोनच्या माध्यमातून शोध सुरू
नागरी वस्तीच्या लगतच बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान वनविभागाने गुरुवारी शोध मोहिमेनंतर शुक्रवारीही 4 ड्रोन आणि 12 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने वनविभागाने जंगल असलेल्या ठिकाणी शोध घेतला मात्र बिबट्या आढळला नाही. अखेर भयभयीत नागरिकांच्या दिलाशासाठी वनविभागाने शुक्रवारीही शोध मोहीम सुरूच ठेवली आणि घटनास्थळी ठाण मांडून बसलेले आहेत.