दिनेश कांबळे : शहापूर
शहापुर तालुक्यात दहा ते अकरा बिबट्यांचा मुक्तसंचार अशा आशयाची बातमी दैनिक पुढारी ने नुकतीच प्रसिद्ध केली होती. त्याला वनविभागाने दुजोरा दिला होता. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा शहापुर तालुक्यातील डोळखांब या शहराचे ठिकाणी हेदवली गावाच्या मानव वस्तीत पहायला मिळाला.
शुक्रवार ( दि.13 जुन) पासून तालुक्यातील डोळखांब - साकुर्ली दरम्यान मुख्य रस्त्याचे कडेला हेदवली गावाचे जवळ बिबट्याने अक्षर:क्ष धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या पशुधन संकटात आले असून कोंबड्या, शेळ्या मेंढ्या, वासरु, भटके श्वान यांच्यावर बिबट्याचा रात्री हल्ला होत आहे. बिबट्याचा मुक्तसंचार सुरू आहे. जवळच आदिवासी प्रकल्प विभागाची आश्रमशाळा असुन येथे काही कर्मचाऱ्यांनी कोंबड्या पाळल्या असल्याने येथे तर रोजच बिबट्याचा संचार असतो.
बांधनपाडा गावचे मोबाईल व्यवसायीक महेश भोईर शनिवार ( दि.14 जुन) रोजी दुकानबंद करून संध्याकाळी दुचाकीवरून घरी जात असतांना पोस्टऑफिसजवळ रस्त्यानजीक दबा धरून बसलेल्या बिबट्याने वाहनाच्या दिशेने झडप घातली. मात्र यामध्ये भोईर बालंबाल बचावले आहेत. तर हेदवली गावाचे संदिप घनघाव हे रस्त्याने येतांना बिबट्या थेट दुचाकीस्वाराला आडवा आल्याने त्यांनी प्रसंगावधान होत वाहन रस्त्याचे कडेला असलेल्या शेतात उतरवून जीव वाचवला. तर सोमवार ( दि.16 जुन) रोजी रात्री झुडपा मध्ये बसलेल्या बिबट्याची चित्रफित नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली आहे. शंभर दिडशे नागरिकांचा ताफा, वनविभागाचे वाहन आणि स्थानिकांची गस्त असूनही बिबट्याचा वावर सुरु असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.
गावातच सात किमी अंतरावर आजोबा देवस्थान आहे. तसेच चोंढे जलविद्युत प्रकल्प आहे. या जंगलात अंदाजे सहा ते सात बिबट्यांचा नियमित वावर असतो. त्यामुळे एकाच वेळी बकऱ्यांच्या कळपात शिरून बिबट्या विस ते पंचविस बकऱ्या फस्त करत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात असून गाई, बैल, म्हशी यासारखी जनावरे देखील बिबट्याकडून फस्त केली जात आहेत. काही स्थलांंतरीत होणाऱ्या बिबट्यांनी घाटघर या परंपरागत मार्गाने चोंढे जंगलातून आता शहराच्या ठिकाणी भक्षाच्या शोधात मार्गक्रमण केल्याने वनविभाग देखील मुक्तसंचार करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात हतबल झाल्याचे दिसून येत आहे.