ठाणे : ठाण्यातील पोखरण रोड नं २ परिसरातील बेथनी रुग्णांलयाच्या पाठमागे बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेचे वृत्त समजताच वन विभागाने या ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्याची तयारी केली होती.
मात्र या परिसरात विकासक ओबेराय यांचे काम सुरू असल्याने वनविभागाने २५ डिसेंबरला त्यांच्याकडून परवानगी मागूनही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. ही परवानगी दुसऱ्या दिवशी दिल्याने एक दिवस वाया गेल्याने या बिबट्याला शोधणे आणखी कठीण झाल्याचे वन विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. तर अद्याप या बिबट्याला शोधण्यात यश न आल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे.
संपूर्ण राज्यातच बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत, तर काहींनी आपला जीव गमवावा लागला आहे. मिरा-भाईंदर परिसरात तर राहत्या गृहसंकुलात घुसून बिबट्याने रहिवाशांवर हल्ला केला होता. आता ठाण्यातही पोखरण रोड नं २ च्या परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात आला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून हा बिबट्या या परिसरात फिरत असून वन विभागाच्या वतीने ड्रोनच्या साहाय्याने त्याचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप हा बिबट्या वन विभागाच्या हाताला लागेलेला नाही.
बिबट्या शोधणे कठीण...
या परिसरात बिबट्या दिसला असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात आल्यानंतर वनविभागाच्या वतीने तत्काळ या ठिकाणी शोध मोहीम घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या ठिकाणी ओबेरॉय यांचे काम सुरू असल्याने त्यासाठी २५ डिसेंबर रोजी वनविभागाच्या वतीने त्यांच्याकडून शोध मोहिमेसाठी परवानगी देखील काढण्यात आली होती. मात्र त्यादिवशी संबंधित विकासकांच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाला परवानगी दिली नसल्याने ही शोधमोहीम वन विभागाला दुसऱ्या दिवशी सुरू करावी लागली असून त्यामुळे हा बिबट्या शोधणे आता आणखी कठीण झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे.