दिनेश कांबळे
डोळखांब: शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीतील परिमंडळ हिंगळुद याठिकाणी कळभोंडे - लाद्याचीवाडी येथील आठ वर्षाच्या मुलाचा जीव घेतल्यानंतरही बिबट्याचा धुमाकुळ सुरूच असून वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अपयशी ठरत आहे.
तालुक्यातील लाद्याचीवाडी याठिकाणी जंगलातील रानमेवा मिळविण्यासाठी गेलेल्या कृष्णा आगिवले या आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्याला जीव गमवावा लागला. संपूर्ण पोलीस फोर्स तसेच वन कर्मचारी तसेच ग्रामस्थ उभे असतानाही काही अंतरावरच हा बिबट्या मयताचे लचके तोडत होता.
या संपूर्ण घटनेला चार दिवस उलटले नाहीत तर 23 एप्रिलच्या मध्यरात्री याच बिबट्याने येथील मना रामा वीर या शेतकऱ्याची गाय मानव वस्तीत येऊन फस्त केली. तर जावू धोंडू वीर यांचा पाळीव कोंबडा याच बिबट्याने फस्त केल्याने परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.
विशेष म्हणजे 21 एप्रिलपासून पुणे येथील रेस्क्यू टीम तसेच वन कर्मचारी बिबट्यावर लक्ष ठेवून आहेत. आठ चित्रिकरण यंत्रणा, ड्रोन कॅमेरे व जंगलात पिंजरे लावले असताना देखील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग अपयशी ठरत असल्याचे दिसते. त्यामुळे तालुक्यात बिबट्याचा धुमाकुळ सुरूच आहे.
तालुक्यात पंधरा ते सोळा बिबट्यांची नोंद असून बिबटे परंपरागत मार्गाने स्थलांतर करीत आहेत. तसेच डोळखांब, आजोबा पर्वत, गुंडे, वाशाळा, कोथळा, कळभोंडे, चोंढे, खराडा याठिकाणी बिबट्यांची संख्या लक्षणीय आहे.
बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली असून हे बिबटे येतात कुठून, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील रेस्क्यू कॅम्पमध्ये अंदाजे दोनशे बिबटे असून नरभक्षक बिबटे शहापूर तालुक्यातील विविध भागात सोडल्याचा संशय ग्रामस्थांमध्ये आहे.
स्वतंत्र रेस्क्यू टीमचा अभाव
कोथळा - कळभोंडे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची लेखी तक्रार येथील ग्रामस्थांनी घटनेच्या काही दिवस आधी केली होती. परंतु वनविभागाने याकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही. तसेच बिबट्यांची संख्या वाढत असताना देखील वनविभागाकडे स्वतंत्र रेस्क्यू टीम नसल्याने बाहेरील टीमला पाचारण करावे लागत आहे. वनकर्मचाऱ्यांकडे आधुनिक साहित्य देखील नसल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करणे हे कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते.