Ladki Bahin Scheme Fraud Pudhari
ठाणे

लाडकी बहीण योजनेत केवायसीच्या नावाखाली किळसवाणा प्रकार; महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट तयार करून पाठविले अश्लील व्हिडिओ

मोहने परिसरातील ही घटना केवळ एका महिलेची फसवणूक नसून, संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरत आहे

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा: राज्यभर गाजत असलेल्या ‌‘लाडकी बहीण‌’ योजनेच्या अंमलबजावणीतील बेफिकीरी आणि बेकायदेशीर एजंटगिरीचे गंभीर वास्तव समोर आणणारी धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.

केवायसी करून देण्याच्या बहाण्याने एका खाजगी एजंटने महिलेचा मोबाईल ताब्यात घेऊन तिच्याच नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले आणि त्यावरून नागरिकांना अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवत तिची बदनामी केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

मोहने परिसरातील ही घटना केवळ एका महिलेची फसवणूक नसून, संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरत आहे. संबंधित महिलेला ‌‘लाडकी बहीण‌’ योजनेचे पैसे मिळत नव्हते. चौकशीअंती केवायसी अपूर्ण असल्याचे समजल्यावर परिसरातील लोकांच्या सांगण्यावरून तिने केवायसी करून देणारा एजंट म्हणून ओळख असलेल्या रूतिक खंडारे याच्याशी संपर्क साधला.

खंडारे याने केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रांसह एक हजार रुपये घेतले आणि ओटीपी प्रक्रियेसाठी महिलेचा मोबाईल काही काळ स्वतःकडे ठेवून घेतला. मात्र, दिवस उलटूनही केवायसी पूर्ण झाली नाही आणि महिलेच्या खात्यात पैसेही जमा झाले नाहीत.

याचदरम्यान एका व्यक्तीने थेट महिलेपाशी येऊन तिच्या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवल्याची तक्रार केली. ही बाब ऐकून महिला पूर्णपणे हादरली, कारण तिला इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाची माहितीही नव्हती.

यानंतर महिलेच्या मुलीने तपास केला असता धक्कादायक वास्तव उघड झाले. केवायसीच्या नावाखाली मोबाईल घेतलेल्या रूतिक खंडारे यानेच महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावरून अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवले होते. या प्रकारामुळे संबंधित महिलेची सामाजिक प्रतिमा मलिन झाली असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी रूतिक खंडारे याला नोटीस बजावून सोडले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे ‌‘लाडकी बहीण‌’ योजनेच्या अंमलबजावणीत सुरु असलेल्या अनधिकृत एजंटगिरीचा काळा चेहरा समोर आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे कागदपत्रे किंवा मोबाईल देताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे ‌‘लाडकी बहीण‌’ योजनेच्या अंमलबजावणीत सुरु असलेल्या अनधिकृत एजंटगिरीचा काळा चेहरा समोर आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे कागदपत्रे किंवा मोबाईल देताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा

अशा प्रकारच्या घटनांमधून एक स्पष्ट धडा मिळतो की, कोणत्याही योजनेच्या नावाखाली अनोळखी एजंटवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. केवायसी किंवा कोणतीही शासकीय प्रक्रिया करताना स्वतः उपस्थित राहणे आणि अधिकृत केंद्र, बँक किंवा सरकारी कार्यालयाचाच वापर करणे अत्यावश्यक आहे.

आपला मोबाईल, ओटीपी, आधार, बँक माहिती किंवा वैयक्तिक कागदपत्रे कोणालाही देऊ नयेत. ओटीपी हा पूर्णपणे गोपनीय असतो, तो कुणालाही सांगू नये किंवा मोबाईल दुसऱ्याच्या ताब्यात देऊ नये. सोशल मीडियावर आपल्या नावाने काही संशयास्पद घडत असल्यास त्वरित तपास करून पोलिसांत तक्रार करावी.

महिलांनी विशेषतः सावध राहून अशा फसवणूक करणाऱ्या एजंटपासून दूर राहावे. कोणतीही शंका आल्यास त्वरित कुटुंबीय, सायबर सेल किंवा पोलिसांची मदत घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.अशा प्रकारच्या घटनांमधून एक स्पष्ट धडा मिळतो की, कोणत्याही योजनेच्या नावाखाली अनोळखी एजंटवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. केवायसी किंवा कोणतीही शासकीय प्रक्रिया करताना स्वतः उपस्थित राहणे आणि अधिकृत केंद्र, बँक किंवा सरकारी कार्यालयाचाच वापर करणे अत्यावश्यक आहे.

आपला मोबाईल, ओटीपी, आधार, बँक माहिती किंवा वैयक्तिक कागदपत्रे कोणालाही देऊ नयेत. ओटीपी हा पूर्णपणे गोपनीय असतो, तो कुणालाही सांगू नये किंवा मोबाईल दुसऱ्याच्या ताब्यात देऊ नये. सोशल मीडियावर आपल्या नावाने काही संशयास्पद घडत असल्यास त्वरित तपास करून पोलिसांत तक्रार करावी. महिलांनी विशेषतः सावध राहून अशा फसवणूक करणाऱ्या एजंटपासून दूर राहावे. कोणतीही शंका आल्यास त्वरित कुटुंबीय, सायबर सेल किंवा पोलिसांची मदत घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT