कोकणात जाणाऱ्या गाड्या नियमित सुरू करा  pudhari photo
ठाणे

Naresh Mhaske : कोकणात जाणाऱ्या गाड्या नियमित सुरू करा

खा. नरेश म्हस्के यांचे रेल्वे मंत्री, कोकण रेल्वे अध्यक्षांना खरमरीत पत्र

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे अप आणि डाऊन मार्गावरचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहे. पाच ते सात तास विलंबाने गाड्या धावत आहेत. त्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कोकणात जाणाऱ्या गाड्या नियमित सुरू करण्यासाठी खा. नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वेचे चेअरमन यांना खरमरीत पत्र लिहीत कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्याची सूचना केली आहे.

दरम्यान यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजीची लाट आहे. विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

खा. नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि कोकण रेल्वेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतांश प्रमुख गाड्या या निर्धारित वेळेपेक्षा तासन्‌‍तास उशिराने धावत असून ही बाब आता अपवाद नसून रोजचीच समस्या बनली आहे. या सततच्या विलंबामुळे प्रवाशांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत असून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

मार्च महिन्याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, प्रीमियम समजली जाणारी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस 22119 ही गाडी सुमारे सात तास उशिराने धावत होती. तिकिटात जेवणाचा समावेश असून सुद्धा प्रवाशांना जेवण मिळालेले नाही. जेव्हा तेजससारख्या प्रतिष्ठित गाडीची ही अवस्था असेल, तर इतर एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांची स्थिती किती बिकट असेल याची कल्पना करता येणे कठीण असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

प्रवासी रेल्वेच्या तासन्‌‍तास प्रतीक्षेत...

रेल्वेच्या विलंबाबाबतची एसएमएस सूचना प्रणाली पूर्णत: अविश्वसनीय ठरत असल्याची तक्रार असून अनेक प्रवाशांना वेळेवर कोणतीच माहिती न मिळाल्याने त्यांना रेल्वेस्थानकांवर तासन्‌‍तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT