दिलीप शिंदे
ठाणे: कोकणावर यंदा पावसाची दमदार कृपादृष्टी राहिल्याने पावसाने अक्षरशः ‘पाणीदार गिफ्ट’ दिले आहे. मुसळधार पावसामुळे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रमुख धरणे आणि जलप्रकल्प समाधानकारक पातळीवर भरले असून अनेक प्रकल्पांनी पूर्ण क्षमतेचा टप्पा गाठला आहे.
त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचीही चिंता दूर झाली असून, आगामी काळासाठी कोकणाला मोठा जलसाठ्याचा आधार मिळाला आहे.
जलसंपदा विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार कोकण विभागातील अनेक मोठे आणि मध्यम प्रकल्प भरले असून काही प्रकल्पांनी पूर्ण क्षमतेचा टप्पाही गाठला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा जलसाठ्याच्या दृष्टीने कोकणासाठी वरदान ठरला आहे.
ठाणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा जमा झाला आहे. बारवी प्रकल्पात ३४०.१० दशलक्ष घनमीटर, तर तानसा धरणात १४३.७८२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्याचा महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या भातसा प्रकल्पात तब्बल ८४४.७८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला आहे.
याशिवाय मोडकसागरमध्ये १२८.९१० दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा उपलब्ध आहे. या जलसाठ्यामुळे ठाणे जिल्ह्यासह मुंबई महानगर प्रदेशातील पाणीपुरवठ्यालाही मोठा आधार मिळणार आहे.
पालघर जिल्ह्यातील धामणी धरणात २२०.८२७ दशलक्ष घनमीटर, तर कवडास धरणात ८.२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. ठाणे ते सिंधुदुर्गापर्यंत धरणांमध्ये वाढलेला जलसाठा पाहताकोकणातील पाणीप्रश्नाला यंदा मोठा दिलासा मिळाला आहे.
पिण्याचे पाणी, शेती आणि सिंचनासाठी आवश्यक साठा उपलब्ध झाल्याने पुढील काही महिन्यांचे जलनियोजन अधिक सुकर होणार आहे. पावसाची स्थिती आणि वाढता जलसाठा पाहता आगामी काळातील पाणीपुरवठ्याबाबत दिलासादायक चित्र आहे.धरणांच्या भक्कम जलसाठ्यामुळे कोकणाला यंदा पावसाचे 'पाणीदार गिफ्ट' मिळाले असून, पाणीटंचाईची टांगती तलवार तूर्तास दूर झाली आहे.
सिंधुदुर्गात धरणे भरली; तिलारीत सर्वाधिक साठा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पात तब्बल ४७७.३६९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला असून धरणातून ३६.६ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.अरुणा प्रकल्पात ९२.०२५ दशलक्ष घनमीटर साठा असून ४.२४ क्युसेक, तर कोर्ले-सातंडी प्रकल्पात २५.४७४ दशलक्ष घनमीटर साठा असून २२.२८ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. देवघर प्रकल्पातही ९८.०२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
रायगडमध्ये २४ लघुप्रकल्प शंभर टक्के भरले!
रायगड जिल्ह्यात जलसाठ्याने मोठी मजल मारली आहे. एकूण ५.१२ टीएमसी साठवण क्षमता असलेला हेटवणे मध्यम प्रकल्प ९५.५३ टक्के भरला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील २८ लघु प्रकल्पांपैकी तब्बल २४ प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
धरणांत साठा; तीन प्रकल्पांत विसर्ग सुरू
रत्नागिरी जिल्ह्यातील गडनदी मध्यम प्रकल्पात ६६.३८७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरणातून १९.३२६ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. अर्जुना प्रकल्पात ७२.५६ दशलक्ष घनमीटर साठा असून ६.८१० क्युसेक, तर नातूवाडी प्रकल्पात १८.३७७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून १.७५ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.