ठाणे : दिलीप शिंदे
हवामान बदल, ओला -कोरडा दुष्काळ, भात शेती खराब झाली, आंब्याचे पीक हातून गेले किंवा कर्जबाजारीपणामुळे कोकणातील शेतकऱ्याने कधी जीवन संपवले नाही. मात्र मराठवाडा - विदर्भातील शेतकऱ्यांप्रमाणे परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्याने कीटकनाशके प्राशन करून जीवन संपवले .तसा अहवाल मुरबाड तहसीलदारांनी आज ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आणि ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील दुस-या शेतक-याने जीवन संपवले.
देशातील सर्वाधिक शेतकरी महाराष्ट्रात जीवन संपवत आहेत. कर्नाटक राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी ते डिसेम्बर 2024 मध्ये महाराष्ट्रात दररोज सरासरी सात प्रमाणे वर्षभरात 2 हजार 706 जणांनी जीवन संपवले. त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील शेतक-यांनी जीवन संपवल्याची स्थिती चिंताजनक आहे.
बीड, अकोला, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील शेतकरी हे कर्जाच्या वसुलीसाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून जीवन संपवतात. हे प्रमाण 2025 मध्ये देखील कायम आहे. गेल्या आठ महिन्यात 1 हजार 183 शेतकऱ्यांनी जीवन संपवले. कर्ज वसुलीसाठी सावकार तसेच बँकांचा ससेमिरा सुरु होतो आणि त्या निराशेतून शेतकरी जीवन संपवत असल्याचे विदारक चित्र राज्यात आहे. कोकणात मात्र शेतकरी जीवन संपवत नसल्याचे सकारात्मक चित्र आहे.
कर्ज काढून शेती करण्याचे, लग्न लावण्याचे प्रमाण नगण्य असल्याने अवेळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे पीक वाहून गेले तरी कोकणी शेतकरी जीवन संपवण्याचा मार्ग स्वीकारत नाही. कर्जबाजारी होण्याला कोकणात मान्यता नसल्याने तो जोमाने पुन्हा कामाला लागतो आणि प्रामाणिकपणे काढलेले कर्ज वेळेत चुकता करतो. असे सकारात्मक चित्र कोकणात असताना ठाणे जिल्ह्यात शेतकरी जीवन संपवण्याची गेल्या नऊ वर्षात दुसरी घटना घडली.
मुरबाड तालुक्यातील धसईजवळील जायगाव येथील रमेश गणपत देसले या 52 वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपवले . त्याने पिकावर फवारणीसाठी आलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. परतीच्या पावसामुळे भाताचे पीक गेल्याने कर्ज कसे फेडायचे या मानसिक त्रास असह्य झाल्याने त्याने जीवन संपवण्मायाचा मार्ग पत्करला. त्या शेतकऱ्यावर सोसायटीकडून घेतलेले 98 हजार आणि 60 हजार असे 1 लाख 58 हजारांचे कर्ज थकलेले आहे.
याबाबतचा अहवाल आणि जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटूंबाला एक लाखांच्या आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव जिल्हा समितीने मंजूर केल्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठविला जाईल. तहसीलदारांच्या या अहवालात देसले या शेतकरी कर्जबाजारीपणामुळे जीवन संपवल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांना कशी होते सरकारी मदत
जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला सरकारकडून एक लाखाची आर्थिक मदत मिळते
के. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतगर्त सर्व गरजू शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजना
आरोग्य सुविधा, राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे, मनरेगाची कामे,
शेती विकासांतर्गत शासनाच्या विविध विभागामार्फत उपाययोजना
ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या नोंदीने चिंता
भारतात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांपैकी 60 टक्के आत्महत्या ह्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील आहेत. देशभरातील 38 टक्के आत्महत्या ह्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामध्ये बहुतांशी आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या आहेत. 2025 च्या अहवालात आता ठाणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची नोंद होईल.
गृहमंत्रालयाच्या एनसीआरबी अहवालानुसार देशातील 'इतक्या' शेतकऱ्यांनी जीवन संपवले
2015 - 12 हजार 602
2016 - 11 हजार 379
2017- 10 हजार 655
2018 - 10 हजार 349
2019 - 10 हजार 281
2020 - 10 हजार 677
2021- 10 हजार 881
2022 - 11 हजार 290
2023 - 10 हजार 786