

ठाणे : ठाणे महापालिकेने नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर केली असून या प्रारुप मतदार यादीमधून तब्बल तीन टर्म नगरसेवक असलेल्या माजी नगरसेवकाचेच नाव वगळले असल्याचे समोर आले आहे. निवडणूक विभागाच्या या कारभारामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून या याद्याच सदोष असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नाव वगळण्यामागे राजकारण असल्याचा आरोप माजी नगरसेवकाकडून करण्यात आला आहे.
आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे समोर आले आहे. मुंब्र्यातील आनंद नगर कोळीवाडा या परिसरातील प्रभाग क्रमांक 31 च्या मतदार यादीमधून तब्बल तीन टर्म नगरसेवक असलेल्या सुधीर भगत यांचेच नाव मतदार यादीमधून वगळण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
दुबार नावे वगळताना कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता त्यांचे नाव वगळण्यात आले असल्याचे भगत यांचे म्हणणे आहे. नाव समान असले तरी मतदार नोंदणी क्रमांक हा प्रत्येकच वेगळा असताना या गोष्टी का तपासल्या जात नाहीत? जोपर्यंत स्वतः अर्ज देण्यात येत नाही तोपर्यंत निवडणूक विभागाला नावे वगळण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न भगत यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले आहे.
तीन टर्म नगरसेवक
सुधीर भगत हे मुंब्र्यातून तीन वेळा यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक राहिले आहेत. सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संपर्क नेते या पदावर आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघडीचे काम देखील सक्रियपणे केले होते. मतदार यादीमधून आपले नाव वगळण्यात आल्याने यामागे मोठे राजकारण असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे निवडणूक विभागाच्या कामावर मात्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.