भाईंदर : काशिमीरा येथील दाचकूल पाड्यात ऐन दिवाळीच्या सणात दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता घडली. त्यातील एका गटातील पिडीतांची भेट घेण्यासाठी गुरुवारी भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या आले असता त्यांनी हा वाद लव्ह जिहादचाच असल्याची पुष्टी प्रसार माध्यमांसमोर जोडली.
दाचकूल पाड्यातील एका मुस्लिम मुलाने एका हिंदू अल्पवयीन मुलीला आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला फॉलोअप करण्यास सांगितले. तसेच तिला मोबाईलवर आय लव्ह यु चा मेसेज पाठवून त्याचे उत्तर देण्यास सांगितले. उत्तर न दिल्यास तसेच इन्स्टाग्रामला फॉलोअप न केल्यास तिला व तिच्या भावाला मारण्याची धमकी त्या तरुणाकडून देण्यात आली. याबाबत त्या मुलीने आपल्या भावाला सांगितल्याने त्यांनी त्या तरुणाला पकडून काशीगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी याप्रकरणी त्या तरुणाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्याचा राग आल्याने 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास सुमारे 50 जणांच्या जमावाने ती मुलगी राहत असलेल्या ठिकाणी धारदार शस्त्रासह हल्ला केल्याची घटना घडली. त्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेला तेथील रिक्षांच्या बेशिस्त पार्किंगमुळे जागा न मिळाल्याने संतप्त जमावाने तेथील सुमारे 50 हुन अधिक रिक्षांचे नुकसान केले. याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या जमवावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्पूर्वी येथील भुमाफिया तथा पाणी माफिया सुकू यादव नामक व्यक्तीचा काही स्थानिकांसोबत वाद झाला होता. त्यातूनच त्याच्या मालकीच्या रिक्षांचे नुकसान करण्यात आल्याचे बोलले जात असले तरी दोन गटांमध्ये झालेल्या वादाला जतीय वादाचा रंग दिला गेल्याने येथील तणाव वाढला.
घटनेची माहिती मिळताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हल्ल्यतील जखमी तरुणांसह त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी याप्रकरणी पोलिसांना हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच आ. नरेंद्र मेहता यांनी देखील घटनास्थळाला भेट दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यानंतर गुरुवारी संध्याकाळी भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी पिडीतांसह त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत हि घटना लव्ह जिहादचीच असल्याची पुष्टी जोडली.
घटनेतील हल्लेखोर हे बांगलादेशी असल्याचा दावा
यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चिंता व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेतील हल्लेखोर हे बाहेरील तसेच बांगलादेशी असल्याचा दावा त्यांनी केला असून त्यातील एकालाही सोडले जाऊ नये, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. याप्रकरणी राज्य सरकार गंभीर सुद्धा गंभीर असून कोणत्याही परिस्थितीत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तर रिक्षांच्या नुकसान प्रकरणी अद्याप एकही तक्रारदार पुढे आला नसल्याने त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.