ठाणे : जवळपास अडीच हजार लोकलचा पसारा असलेल्या मुंबई लोकलमध्ये १ हजारच्या घरात असलेले तृतीयपंथी पैसे मागण्यासाठी लोकल रेल्वेत अक्षरशः धुमाकूळ घालत असल्याने महिला प्रवाशांची मोठी कोंडी होत असल्याचे दिसत आहे.
तृतीय पंथीयांना कुठल्या डब्यात जावे याबाबत कुठलाच नियम नाही. त्यामुळे जनरल डब्यापासून महिला डब्यांपर्यंत त्यांचा मोठा वावर असतो. हार्बर लाईनवर कुर्ला ते गोवंडी दरम्यान महिला डब्यात घुसलेल्या तृतीय पंथीयाला महिला पोलिसाने हुसकावल्याने महिला पोलिसाच्याच कानशिलात लगावली, असे प्रकार दररोज सहा-सात तरी होतात. हाताच्या टाळ्या व डोक्यावर हात ठेवत घुसणारे तृतीय पंथीय टोळक्याने डब्यात चढतात. एखाद्या प्रवाशाने त्यांना पैसे देण्यास नकार दिला तर त्यांना शिव्या शाप देतात. या वाढत्या उपक्रमामुळे रेल्वे पोलीस यावर काय करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ठाणे रेल्वे स्थानकावर दररोज मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी लोकल डब्यांतून बेकायदा प्रवास करतात. प्रवासादरम्यान इतर प्रवाश्यांसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार ठाणे रेल्वे सुरक्षा बलाकडे प्रवाश्यांकडून करण्यात येते. तसेच ठाणे रेल्वे सुरक्षा बलाच्या माहितीनुसार दररोज ठाणे रेल्वे स्थानक व लोकल रेल्वेमधून गैरवर्तन करणाऱ्या १६-१७ किंवा अधिक तृतीयपंथींना अटक करण्यात येते. परंतु तृतीयपंथींची लोकलमधली मुजोरी कमी होत नसल्याचे संतप्त प्रवाश्यांचे म्हणणे आहे. ऑगस्टमध्ये डोंबिवली लोकलमध्ये महिलांच्या आरक्षित डब्यात महिला प्रवाशांना अश्लील हावभाव केल्याची तक्रार डोंबिवली रेल्वे स्थानकावर करण्यात आली. काही वेळा गैरवर्तन करणाऱ्या तृतीयपंथींवर तक्रार करण्यात येते परंतु त्यांचे प्रवाश्यांकडून जबरदस्तीने पैसे उकळणे अद्याप थांबलेले नाही, असेही संतप्त प्रवाशांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर दिवा रेल्वे सुरक्षा बलाच्या आराखड्यानुसार दरदिवशी तृतीयपंथींच्या गैरवर्तनाची दिवा रेल्वे स्थानकावर नियमित १० ते १२ गुन्हे दाखल होतात.
कुठल्याही डब्यात चढणे, अचकट विचकट चाळे करणे असे प्रकार सर्रास होत असल्याने तृतीय पंथीयांबद्धलच्या प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र या प्रकाराकडे रेल्वे प्रशासन डोळेझाक करत आहे.