Thane Industrial Pollution pudhari photo
ठाणे

Thane Industrial Pollution : खडवलीत कारखाने प्रदूषणाचा प्रश्न कायम

वारंवार अर्ज, तक्रारी; ग्रामपंचायतीच्या नोटिसांनंतरही कारवाई अडली

पुढारी वृत्तसेवा

खडवली : खडवली पश्चिम येथील कारखाने आणि निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून कायम आहे. याबाबत वारंवार अर्ज, तक्रारी आणि बातम्या प्रसिद्ध करूनही परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

२०२५ मध्ये ग्रामपंचायतीने संबंधित कारखानदारांना नोटीस बजावून आवश्यक परवानग्या, घरपट्टी तसेच व्यवसायाची माहिती मागवली होती. माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाई करून व्यवसाय बंद करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, आजही संबंधित कारखाने सुरू असून परिसरात कचरा टाकणे आणि जाळण्याचे प्रकार सुरू असल्याची तक्रार आहे.

२९ ऑक्टोबर रोजी दैनिक पुढारीमध्ये याच विषयावर प्रदूषणाच्या धोक्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊनही परिस्थिती दाखविण्यात आली. तरीही ठोस बदल झालेला नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, १८ नोव्हेंबर रोजी पुन्हा ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज देण्यात आला. मात्र, त्यावरही अद्याप ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. विचारणा केली असता, २०२५ मध्ये दिलेली हीच नोटीस २०२६ मध्येही दिल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

याबाबत वारंवार अर्ज करूनही कारवाई होत नसेल, तर प्रशासनाने नेमकी कोणती कार्यवाही केली, याचा खुलासा करणे आवश्यक आहे. संबंधित कारखान्यांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई करावी आणि परिसरातील कचरा व प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT