कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उंबर्डे कचरा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी भाजप आमदार सुलभा गायकवाड गेल्या होत्या. त्यावेळी त्याठिकाणी कार्यरत असलेल्या सुपरवायझर किरण रसाळ याने मद्यपान केले असल्याचा आरोप करीत भाजप पदाधिकारी विजय जोशी याने रसाळ यांना मारहाण केली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींंची नावे संदीप सरवणकर आणि सौरभ सिंग अशी आहेत. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली आहे. मात्र रसाळ यांना मारहाण करणारा मुख्य आरोपी जोशी आणि त्याचा अन्य एक सहकारी या दोघांना पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
मुख्य आरोपी जोशी याची पत्नी भाजपची नगरसेविका आहे. त्यामुळे त्याला अटक केली जात नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या घटनेनंतर पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत शिंदे सेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी मागणी केली होती की, सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? कारण घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला.
दरम्यान, सुपरवायझर रसाळ यांना मारहाण झाल्यापासून ते आजपर्यंत खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. रसाळ यांनी सांगितले की, ही घटना ज्या दिवशी घडली. त्यादिवशी त्यांची तब्येत ठिक नव्हती. अंगात ताप असताना ते कामावर हजर होते. पाहणीसाठी आमदारासोबत जे लोक आहे. ते गाडीतून आले होते.
उतरल्यावर त्यांनी त्याठिकाणी किती दुर्गंधी सुटली असल्याचे सांगून रसाळ यांच्याकडून मास्क मागून घेतले. त्यानंतर त्यांनी रसाळ मद्यपान करुन कर्तव्य बजावित असल्याचा आरोप करीत त्यांना मारहाण केली. त्यामुळे रसाळ यांच्या कानाच्या पडद्याला गंभीर दुखापत झाली आहे. रसाळ यांनी या प्रकरणी त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.