

ठाणे : ठाण्याची शान असलेल्या मासुंदा तलावातील प्रदूषण रोखण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश जमनोर आणि कार्यकारी अभियंता कृषिकेश जवळकर यांना गुरुवारी रात्री उशिरा निलंबित करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
देवी विसर्जनाच्या वेळी मासुंदा तलावात थेट मूर्ती विसर्जन होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले होते.
मासुंदा तलावात गणेशमूर्ती आणि देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यास सक्त मनाई आहे. तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था केली जाते. तसेच पाच फुटांपेक्षा उंच मूर्तींचे विसर्जन खाडीमध्ये करण्याची व्यवस्था आहे. मासुंदा तलाव परिसरातील दत्त घाट येथे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात गेल्या अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती आणि देवीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र, यंदा विसर्जनाच्या व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे थेट तलावातच मूर्ती विसर्जन झाल्याचा प्रकार समोर आला.
२० ऑक्टोबर रोजी अहिल्यादेवी घाटावरील प्रवेशद्वार खुले राहिल्याने देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांनी थेट मासुंदा तलावात मूर्तींचे विसर्जन केले. त्यामुळे तलाव परिसरात रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी झाली होती. तलावात थेट मूर्ती विसर्जन होत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला. त्याचबरोबर गर्दीमुळे संभाव्य दुर्घटनेची शक्यताही वाढली होती.
दरम्यान, टेंभी नाका येथील देवीच्या विसर्जन मिरवणुकीसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मासुंदा तलाव परिसरात आले असता, त्यांच्या निदर्शनास तलावात सुरू असलेले थेट विसर्जन आले. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र, त्यावेळी महापालिकेचा एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
तलावाचे प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असतानाही संबंधित अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याने त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. तलावाच्या प्रदूषणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा तिन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर
मासुंदा तलावाचे प्रदूषण रोखणे, विसर्जनाच्या ठिकाणी योग्य व्यवस्था राखणे आणि भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे या बाबींमध्ये झालेल्या कथित हलगर्जीपणामुळे तिन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे विसर्जन व्यवस्थेतील त्रुटी आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जबाबदारीतील हलगर्जीपणा भोवला
नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश जमनोर यांच्याकडे तलाव परिसराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. तर कार्यकारी अभियंता कृषिकेश जवळकर यांच्याकडे विसर्जनस्थळावरील व्यवस्थेची जबाबदारी होती. विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमा झाले असताना तलावात थेट मूर्ती विसर्जन सुरू राहणे आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे न राबविल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.