KDMC Transport Crisis Pudhari
ठाणे

KDMC Transport Crisis: तीन वर्षात केवळ दहा ई बसेस; 207 बसेसचे कंत्राट रद्द

केडीएमसीच्या परिवहन उपक्रमाचे आर्थिक चाक अधिकच खोलात

पुढारी वृत्तसेवा

सतीश तांबे

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे आर्थिक चाक दिवसेंदिवस अधिकच खोलवर रुतत चालले आहे. परिवहन उपक्रमाला आर्थिक खाईतून बाहेर काढण्यासाठी शासनाने पंधराव्या वित्तीय आयोगाच्या निधीतून भाडेतत्वावर बसेस खरेदीसाठी खासगी कंपनीला कंत्राट दिले होते.

वरवरच्या उपक्रमांकडून बसेस पुरवण्यासाठी खासगी कंपनीकडे वारंवार मागणी व नोटीसा बजावूनही तीन वर्षात केवळ 10 ई बसेस पुरविल्याने उर्वरित 207 ई बसेसचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या तुटपुंजा बसेस वर उपक्रमाची मदार अवलंबून असून उपक्रमाचा गाडा पुढे हाकलण्याची नामुष्की ओढवली आहे.

केडीएमसी उपक्रमाच्या ताफ्यात सध्या 100 ते 120 बसेस असून त्यातील 75 बसेस विविध 41 बस मार्गावर दैनंदिन धावत असतात. पालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची सुरू असलेली कामे तसेच कल्याण स्टेशन परिसर सुशोभीकरणामुळे परिवहन उपक्रमाच्या अनेक मार्गावरील बसेस रद्द करण्यात आले आहे.

परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे वेतन, बसेसच्या मेंटेनन्स, तसेच डिझेलवर होणारा खर्च हा उपक्रमाच्या उत्पनापेक्षा दुपटीने होत आहे. अखेरीस उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पालिका प्रशासनाकडून दरमहा अनुदान दिल्यावरच कर्मचाऱ्याचे वेतन अदा केले जात आहे.

परिवहन सेवा ही जनतेच्या सेवेसाठी असल्याने या सेवेतून भरघोस उत्पन्न मिळण्याची अपेक्षा करणे चुकीचे असले तरी परिवहन उपक्रमाच्या या बस मार्गावरील बसेवेतील प्रवाशी भाड्यातून किमान डिझेल व बसेसच्या देखभाल दुरुस्तीचा तरी खर्च निघावा, अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.

पालिकेतील जुनाट व कालबाह्य होत असलेल्या बसेस नादुरुस्त अवस्थेत रस्त्यावर बंद पडत असल्याने पालिका उपक्रमाला मदतीचा हात दिला. गेल्या तीन वर्षापूर्वी शासनाच्या पंधराव्या वित्तीय आयोगाच्या निधीतून केडीएमटी उपक्रमाने पर्यावरणपूरक इ-बसेसचा ताफा वाढवण्याचे नियोजन केले होते.

उपक्रमातील बसेसवरच मदार

पहिल्या टप्प्यात 107 तर दुसऱ्या टप्यात 100 अश्या 207 ई-बसेसचा पुरवठा खासगी कंपनीकडून टप्प्याटप्प्याने केला जाणार होता. मात्र, बसेसचा पुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीकडून गेल्या तीन वर्षात केवळ 10 इ बसेसचा पुरवठा करण्यात आल्या आहेत.

वारंवार बसेस पुरवठा करण्यासाठी मागणी संदर्भात नोटीसा बजावूनही बस पुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अखेरीस उपक्रमाने उर्वरित 197 इ बसेस पुरविण्याचे खासगी कंपनीला दिलेले कंत्राट रद्द केल्याने पालिकेवर सद्यस्थितीत उपक्रमात असलेल्या बसेसवर बस सेवेची मदार अवलंबून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT