डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील कर विभागाच्या लिपिकाला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराचे घरपट्टीचे काम रखडले होते. ते मार्गी लावण्यासाठी कर विभागातील लिपिकाने सहा हजार रुपयांची मागणी केली. कामासाठी पैसे मागताच तक्रारदाराने संयम सोडला आणि थेट ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे दार ठोठावले.
लाच विरोधी पोलिसांनी तक्रारीची गुप्त पडताळणी केली. लाच मागितल्याचे स्पष्ट होताच सापळा रचण्यात आला. ठरलेल्या ठिकाणी लाचेची रक्कम हाती पडताच लिपिकाला पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.
गेल्या काही वर्षांत लाचखोरीच्या तक्रारींचा पाऊस पडतो आहे. लहानसहान दाखल्यापासून ते मोठ्या परवानग्यांपर्यंत प्रत्येक कामासाठी नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. आता लाचखोरांचा आकडा पन्नासच्या घरात गेला आहे. ठाण्याच्या लाचविरोधी पोलिसांनी लाचखोर लिपिकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असून धडक कारवाईमुळे खळबळ माजली आहे.
पीडितांनी थेट तक्रार करावी
या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. पीडितांनीही घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.