KDMC Health Mission Pudhari
ठाणे

KDMC Health Mission: केडीएमसीच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतन नाही

सुमारे २०० कर्मचारी पालिका मुख्यालयात धडकले; तातडीने वेतन न दिल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सुमारे 200 कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने अस्वस्थ आहेत. वेतन मिळावे म्हणून तगादा लावूनही केडीएमसीच्या वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने अखेर बुधवारी या कर्मचाऱ्यांनी कल्याणमध्ये मुख्यालयात येऊन आरोग्य विभागाच्या प्रमुखांची भेट घेतली आणि वेतन तातडीने देण्याची मागणी केली. वेतन देण्यात आले नाही, तर काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

हातात निषेधाचे फलक घेऊन सुमारे दोनशे कर्मचारी बुधवारी पालिका मुख्यालयाच्या आवारात धडकले. यावेळी सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा- समोर उभे राहून आपला निषेध नोंदविला. कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एक निवेदन आयुक्तांसह वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. या कर्मचाऱ्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (15वा वित्त आयोग) डॉक्टर, परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी यांचा समावेश आहे. यापूर्वीही या कर्मचाऱ्यांचा पगार एक ते दोन महिन्यांनी होत होता.

आता चार महिने होत आले तरी वेतन मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. आम्ही घरे घेतली आहेत. त्या घरांचे बँक कर्जाचे हप्ते आमच्या वेतनातून जातात. वेतन नसल्याने ते हप्ते थकले आहेत. आमची मुले शाळेत जातात. त्यांचे शैक्षणिक आणि इतर शुल्काचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरात ज्येष्ठ, वृद्ध आहेत. त्यांचे आजार, दैनंदिन प्रवास खर्च, आदी अनेक प्रश्न वेतन मिळत नसल्याने गंभीर स्वरूप धारण करून उभे आहेत. आम्हाला फक्त वेतन मिळेल, अशी आश्वासने प्रशासनाकडून मिळतात. प्रत्यक्षात त्याच्यावर कार्यवाही होत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाकडून पालिकेला वेतन निधी आल्याचे सांगण्यात येते. तरीही आम्हाला वेतन देण्यास टाळाटाळ कोण करतो? त्याची चौकशी करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली. केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांची भेट घेतली. त्यांच्याकडून वेतन कधी होईल याची ठोस माहिती दिली जात नाही. किंवा त्यांच्या बोलण्यातून वेतन होण्याची कोणतीही स्पष्टता दिसत नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

महागाई भत्त्यासाठी कोणती अडचण?

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी दिली जाते.

ही वेतनश्रेणी आम्हाला देण्यात आलेली नाही. महागाई भत्ता दिला जात नाही. वसई-विरार, उल्हासनगर आणि ठाणे महापालिकांमध्ये अभियानातील कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन होते. त्यांना नियमित वेतनश्रेणी दिल्या जातात. महागाई भत्ता मिळतो, मग कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कोणती अडचण आहे? असे प्रश्न कर्मचारी उपस्थित करत आहेत. अधिक माहितीसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क साधला.त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT