Kalyan Dombivli Municipal News Pudhari
ठाणे

Kalyan Dombivli Municipal News: KDMC उद्यान विभागाच्या खर्चावर संशय; तीन वर्षांत २.३९ कोटी, तर एका वर्षात २५ कोटींचा खर्च

दोषीवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक जाधव यांनी महासभेत केली.

पुढारी वृत्तसेवा

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडून झाडाचे संवर्धन, देखभाल, छाटणी आदी कामासाठी तीन वर्षात दोन कोटी ३९ लाख रुपये खर्च केले तर एकाच वर्षासाठी २५ कोटी रुपये खर्च झाल्याचा भांडाफोड शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक गणेश जाधव यांनी करीत अचानक वाढलेल्या खर्चाबाबत महासभेत उपस्थित करून उद्यान विभागाला चांगलेच धारेवर धरले होते.

उद्यान विभागाने सभागृहात दिलेली लेखी माहिती व तोंडी माहिती या मध्ये तफावत असल्याने संशयास्पद खर्चाबाबत सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक जाधव यांनी महासभेत केली.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या उद्यान विभागा तर्फे झाडांची छाटणी, तोडणी, विल्हेवाट व उ‌द्यानांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. पालिका क्षेत्रातील झाडांची छाटणी, तोडणी, विल्हेवाट व उ‌द्यानांच्या देखभाल-दुरुस्तीच्या झालेल्या कामांच्या खर्चाची तसेच पालिकेची उ‌द्याने भाडेतत्त्वावर देताना कोणते निकष लावण्यात आले. आदी गंभीर प्रश्नांची शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक गणेश जाधव यांनी उद्यान विभागकडे माहिती मागितली होती.

उद्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालिका क्षेत्रातील दहा प्रभागातील झाडांचे संवर्धन, देखभाल, त्यांची छाटणी करणे आदी कामासाठी झाडांच्या गणनेसहस २०२१ मध्ये ३१,५५,८९१ रुपये , सन २०२२ मध्ये र५०,२३,५५७/- रुपये, सन २०२३ मध्ये रु. १,८७,३९,६१३/- रुपये असे एकूण तीन वर्षांकरिता २ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. तर सन २०२४ साला करीता एका वर्षांकरिता २५ कोटी ६३ लाख रुपयांचा खर्च झाला असल्याचे नमूद केले होते.

एकाच वर्षात अचानक खर्च कसा काय वाढला असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. त्यावर २ कोटी ६३ लाखाचा खर्च झाल्याची माहिती दिली नसल्याचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी स्पष्ट केले. जाधव तोंडी सांगत असलेली माहिती आणि लेखी दिलेली माहिती यात तफावत आढळून आली. त्यामुळे २५ कोटी ६४ लाखाचा आकडा कुठून आला? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे अशी मागणी नगरसेवक जाधव यांनी केली. झाडांची छाटणी, तोडणी, विल्हेवाट व उ‌द्यानांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांमध्ये झालेल्या संशयास्पद खर्चाबाबत सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी महासभेत केली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील १२ उद्याने कंत्राटदारांना चालविण्यास दिलेली आहे. त्यांच्याकडून वसूल केले जाणारे भाडे नाममात्र आहे. मात्र कंत्राटदाराने उद्यानपरिसरात दुकाने, प्लेग्राऊंड आणि खाद्यपदार्थांची दुकाने थाटून ती भाड्याने दिलेली आहे. कंत्राटदार महापालिकेच्या जीवावर कमाई करीत असल्याचे महासभेत निदर्शनास आणून दिले. महापालिकेच्या राणी लक्ष्मीबाई उद्यानात कंत्राटदाराने दोन गाळे उभे केले आहे. ते त्याने भाड्याने दिलेले आहे. त्यातून त्याला महिन्याला ५० हजार रुपये उत्पन्न मिळते. तो महापालिकेस महिन्याला ३ हजार रुपये भाडे देतो. महापालिकेने काळा तलाव स्मार्ट सिटी प्रकल्पातर्गत १९ कोटी रुपयांचा खर्च करुन विकसित केला. कंत्राटदाराकडून महापालिकेस महिन्याला १३ हजार ३३३ रुपये भाडे मिळते. तो मात्र त्यातून चांगलीच कमाई करीत आहे. महापालिकेने उद्याने भाडे तत्वावर देताना बाजार मूल्याचा विचार केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी चौकशी करण्याची मागणी शिंदे सेनेचे नगरसेवक गणेश जाधव यांनी महासभेत केली. या प्रकरणी चौकशी करण्याचे आयुक्तांनी आश्वासन केले आहे.

पालिकेच्या उद्याने, मैदानाच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकच नाहीत

महानगरपालिका हद्दीत ७३ उद्याने आणि १७ मैदाने असून महानगरपालिकेच्या उद्यानांना सुरक्षा रक्षक नाही. उद्यानाची देखभाल दुरुस्ती केली जावी यासाठी ही उद्याने भाडे तत्वावर दिलेली असल्याचा खुलासा उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी महासभेत केला. महापालिकेने ७३ उद्यानांपैकी १२ उद्याने भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. १२ कंत्राटदाराकडून महापालिकेस उद्यानाच्या भाड्यापोटी वर्षाला ८ लाख ५६ हजार रुपये उत्पन्न मिळते. कंत्राटदार भाडे कमी भरतो. त्यातून कमाई जास्त करतो. एकाच कंत्राटदाराला वारंवार काम दिले गेले आहे. एकाच कंत्राटदाराला अनेक ठिकाणी कामे दिलेली आहेत. जे कंत्राटदार महापालिकेचा कर थकवितात, त्यांच्यावरच महापालिकेची मेहरनजर आहे. या सगळ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करुन नव्याने प्रक्रिया राबविली जावी अशी मागणी नगरसेवक जाधव यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT