KDMC Crackdown
नेवाळी : अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आले होते. या संदर्भात कल्याण-डोंबिवली महापालिकेने बांधकामधारकाला कागदपत्र घेऊन कार्यालयात हजर राहण्याची समज देण्यात आली होती. मात्र त्यांनी केडीएमसीच्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केडीएमसी क्षेत्रात असलेल्या 27 गावांमधील द्वारलीत पालिकेने अनधिकृत बांधकाम करणार्यांवर कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. प्रांतिक सरकार जागेमध्ये आरोपी जगदीश पाटील व अन्य एकाकडून घराचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. मात्र या संदर्भात केडीएमसीने कायदेशीर नोटीस पाठवून बांधकामधारकांना कागदपत्रे सादर करण्याची समज दिली होती.
बांधकामधारकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर न करता केडीएमसीच्या नोटीसकडे दुर्लक्ष केले होते. केडीएमसीचे प्रभारी अधिकारी नितीन चौधरी यांच्या तक्रारीनंतर हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर करत आहेत.