शहरातील रस्त्यांच्या देखभाल/दुरुस्ती आणि पावसाळी खड्डे भरण्याच्या कामात वारंवार हलगर्जीपणा Pudhari
ठाणे

KDMC Contractor Blacklisted | केडीएमसीचा दणका : रस्त्यांच्या कामात बेफिकिरी दाखवणारी भारत उद्योग कंपनी काळ्या यादीत; ठेकेदारांचे धाबे दणाणले

गणेशोत्सवात कामचुकारपणा केल्याने एक वर्षासाठी ब्लॅकलिस्टची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

KDMC Bharat Udyog Company Blacklisted

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अखेर आपला कणखर बाणा दाखवत बेशिस्त आणि कामचुकार ठेकेदारांवर मोठ्या कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील रस्त्यांच्या देखभाल/दुरुस्ती आणि पावसाळी खड्डे भरण्याच्या कामात वारंवार हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि बेफिकिरी दाखवणाऱ्या डोंबिवली विभागातील फ प्रभागाच्या ठेकेदाराला केडीएमसीने थेट काळ्या यादीत टाकले आहे.

मे. भारत उद्योग लिमिटेड असे या ब्लॅकलिस्ट झालेल्या कंपनीचे नाव असून त्यांच्याकडून सुरू असलेले संपूर्ण काम काढून घेत त्यांना पुढील एक वर्षासाठी केडीएमसीच्या कोणत्याही निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या जबर दणक्यामुळे ठेकेदारांच्या वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने संपूर्ण कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रत्येक प्रभागनिहाय वेगवेगळ्या ठेकेदारांची नेमणूक केली होती. गेल्या महिन्यात झालेल्या गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व रस्ते तातडीने डांबरीकरण करून सुस्थितीत करण्याचे कडक निर्देश आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून त्यांच्या स्तरावरून सर्व ठेकेदारांना देण्यात आले होते. पावसाने अधूनमधून उघडीप दिल्यानंतर बहुतेक प्रभागांतील ठेकेदारांनी युद्धपातळीवर काम करून आपापल्या प्रभागातील रस्ते समाधानकारकरित्या दुरुस्त करून वाहतुकीसाठी मोकळे केले होते.

मात्र, या सगळ्यात डोंबिवली विभागातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या फ प्रभागासाठी नेमलेला मे. भारत उद्योग लिमिटेड हा ठेकेदार मात्र सगळ्या नियमांना हरताळ फासत होता. केडीएमसीच्या अभियंत्यांनी वारंवार तोंडी सूचना देऊन, लेखी पत्र देऊनही या कंपनीने कामाकडे दुर्लक्ष केले. काही ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून खड्डे बुजवले, तर काही ठिकाणी खड्डे तसेच उघडे ठेवून डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला. गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका आणि भाविकांची मोठी गर्दी असताना देखील रस्त्यांवरचे खड्डे न बुजवल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि किरकोळ अपघाताचे प्रकारही घडले होते. यामुळे डोंबिवलीकरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

शहर अभियंत्यांची कठोर भूमिका

अखेर या संतापजनक प्रकाराची गंभीर दखल घेत केडीएमसीच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी कठोर भूमिका घेतली. गुरूवारी १ ऑक्टोबर रोजी मे. भारत उद्योग लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांच्याकडून फ प्रभागाचे संपूर्ण काम तात्काळ काढून घेतले. त्यानंतर या कंपनीला एक वर्षासाठी ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या अनेक वर्षांत केडीएमसीने एखाद्या ठेकेदारावर केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

उर्वरित ठेकेदारांनाही चपराक

केडीएमसीच्या या धडाकेबाज आणि स्वागतार्ह निर्णयामुळे डोंबिवलीकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची मनमानीमुळे रहिवाशांसह पादचारी आणि वाहनचालक हैराण झाले होते. आता या कारवाईमुळे उर्वरित सर्व ठेकेदारांना चांगलीच चपराक बसली असून भविष्यात कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांचे हात दगडाखाली येतील, हे नक्की झाले आहे. आता फ प्रभागाचे उर्वरित काम दुसऱ्या चांगल्या ठेकेदाराला देऊन ते दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले जाईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT