कल्याण डोंबिवली महानगरपालिका pudhari file photo
ठाणे

Kalyan Dombivli municipal conflict : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 27 गावांच्या संघर्षाला नवे वळण

हा लढा जनतेच्या हक्कांचा : संदीप पाटील; संघर्ष समितीचा लढा

पुढारी वृत्तसेवा

सापाड : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 27 गावांच्या वेगळेपणाच्या संघर्षाला गुरुवारी नवं वळण मिळालं आहे. या गावांना महापालिकेत ठेवण्यासाठी यापूर्वी न्यायालयात याचिका दाखल करणारे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी आता आपली भूमिका बदलत या गावांना महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या ‌‘27 गाव संघर्ष समिती‌’च्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या घडामोडीनंतर संघर्ष समितीचा लढा अधिक जोमाने पुढे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

2015 मध्ये केडीएमसीत 27 गावे समाविष्ट केली होती. या निर्णयानंतर स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या 27 गावांतील नागरिकांना ना चांगले रस्ते मिळाले, ना पिण्याच्या पाण्याची सुविधा, ना आरोग्य केंद्रे, ना शैक्षणिक पायाभूत सुविधा. महापालिका प्रशासनाकडून विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासनांचा पाऊस पडला आहे. पण प्रत्यक्षात गावं अंधारात आहेत.

स्वतंत्र नगरपालिका स्थापन होणे हाच या गावांच्या विकासाचा मार्ग आहे, असे सांगत संदीप पाटील यांनी संघर्ष समितीच्या लढ्याला पाठिंबा देतानाच एक महत्त्वाचा इशाराही दिला. त्यांनी सांगितले की, सर्व 27 गावांना समान हक्क मिळायला हवेत. कुठल्याही प्रकारचा अन्याय झाल्यास मी पुन्हा न्यायालयीन लढाई लढण्यास तयार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आंदोलनाला बळ मिळणार असल्याचे सांगितले.

कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांचा हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शासनस्तरावर या गावांच्या वेगळेपणाबाबत अनेक चर्चा, बैठका झाल्या असल्या तरी ठोस निर्णय अजून झालेला नाही. मात्र आता संदीप पाटील यांच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला कायदेशीर आणि जनआंदोलनाचे दुहेरी बळ मिळण्याची शक्यता आहे.

या नव्या घडामोडीनंतर संघर्ष समितीचा आवाज अधिक बुलंद होणार असून शासनावरही या प्रश्नामुळे ठोस निर्णय घेण्याचा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिका जनतेकडून कर वसूल करत आहे, पण सुविधा शून्य आहेत. आता आम्ही विकास, न्याय आणि हक्कांसाठी लढत राहू. अशी भूमिका 27 गाव संघर्ष समितीकडून घेण्यात आली आहे.

केडीएमसीत गेल्यानंतर गावांचा विकास थांबला आहे. नागरिकांची मूलभूत गरज पूर्ण करण्याऐवजी महापालिकेकडून फक्त टॅक्स आकारला जातो. विकासाचा लाभ न मिळाल्याने गावकरी नाराज आहेत. त्यामुळे या गावांना स्वतंत्र नगरपालिका मिळावी, ही जनतेची मागणी योग्य आहे. मी या संघर्ष समितीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
संदीप पाटील, वास्तुविशारद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT