मिरा रोड : मिरा-भाईंदर शहरात खळबळ माजवून देणाऱ्या काशीमिरा इंटरनॅशनल बेकिंग बेकरी गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख उर्फ पप्पू पेजर याला गुन्हे शाखेने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या या गुन्हेगारावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्याला 20 मार्चपर्यंत 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काशीमिरा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इंटरनॅशनल बेकिंग बेकरीमध्ये 13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 च्या सुमारास हा थरार घडला होता. तक्रारदार चंद्रकांत कोंडगुले कामावर असताना एका अज्ञात आरोपीने त्याच्यावर पिस्टल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने पिस्टल लॉक झाल्याने गोळी सुटली नाही आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, पालघर, मुंबई आणि मिरा-भाईंदर भागात अवैध गुटखा पुरवठ्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि दहशत माजवण्यासाठी हा कट रचण्यात आला होता.
या संघटित गुन्हेगारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या आदेशाने या प्रकरणाला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावण्यात आला. यात पप्पू पेजरसह अक्तर मर्चंट, अकबर अली, मुन्ना पठाण आणि इम्रान शेख यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. गुन्हा घडल्यापासून पप्पू पेजर परदेशात फरार झाला होता. तो बुधवारी मुंबई विमानतळावर उतरणार असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा युनिट-1 ला मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
पप्पू पेजरवर वडाळा ट्रक टर्मिनल, भायखळा आणि काशीमिरा पोलीस ठाण्यात एकूण 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील अक्तर मर्चंट हा अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पप्पू पेजरच्या अटकेनंतर आता अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यासाठी रेकी कोणी केली? गोळीबारासाठी सुपारी कोणी दिली? आणि मिरा-भाईंदरमधील स्थानिक लोकांचा यात सहभाग आहे का? या दिशेने आता गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ तपास करत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश काळे, योगिता बाविस्कर, सहायक फौजदार अविनाश गर्जे आणि त्यांच्या पथकाचा समावेश होता.