Kasara Manmad Railway Project Pudhari
ठाणे

Kasara Manmad Railway Project: कसारा-मनमाडदरम्यान तिसरी-चौथी रेल्वे मार्गिका; नाशिकमधील ४५ गावांत भूसंपादन

१० हजार १५४ कोटींचा प्रकल्प; १३१ किलोमीटरच्या मार्गासाठी ३३४ हेक्टर जमीन आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा: मुंबई ते भुसावळ या देशातील सर्वाधिक व्यस्त रेल्वेमार्गाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी कसारा ते मनमाडदरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील ४५ गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे. साधारणतः ३३४ हेक्टर जमीन संपादित करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने १० हजार १५४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

कसारा-मनमाडदरम्यान १३१ किलोमीटर लांबीच्या दोन नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यात येणार आहेत. मुंबई-हावडा या अतिव्यस्त रेल्वेमार्गाच्या क्षमतेत वाढ करण्याच्या उपक्रमाचा हा महत्त्वाचा भाग आहे. पूर्व, मध्य आणि पश्चिम भारताला जोडणाऱ्या या मार्गावर प्रवासी तसेच मालवाहतूक गाड्यांची वर्दळ असते.

प्रस्तावित रेल्वे मार्गिकेसाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिक, निफाड, चांदवड आणि नांदगाव या पाच तालुक्यांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे. त्यानुसार नाशिक तालुक्यातील १६, निफाडमधील १७, चांदवडमधील सात, इगतपुरीतील चार आणि नांदगाव तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे.

अशा एकूण ४५ गावांमधील ३३४ हेक्टर जमीन प्रकल्पासाठी आवश्यक आहे. सर्वेक्षणानंतर भूसंपादनाचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे.१३१ किलोमीटरच्या या प्रकल्पात २३५ लहान-मोठे पूल उभारले जाणार आहेत. यामध्ये तीन महत्त्वाचे पूल, १६ मोठे आणि २१८ लहान पुलांचा समावेश आहे. कसारा ते इगतपुरीदरम्यान पाच बोगद्यांचेही नियोजन करण्यात आले आहे.

रेल्वे मार्गाची क्षमता वाढणार

या प्रकल्पामुळे रेल्वे मार्गाची क्षमता वाढण्यासह मालवाहतुकीला चालना मिळणार आहे. अधिक प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्यास मदत होईल. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, भावली धरण, श्री घाटनदेवी मंदिर इत्यादी प्रमुख पर्यटन स्थळांसाठी कनेक्टिव्हिटी सुधारेल. उद्योग, शेती, शिक्षण आणि सहकार क्षेत्रासाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

शेतकऱ्यांना कृषिमाल मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक सक्षम रेल्वे वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. बंदरे, वीज प्रकल्प, मल्टि-मोडल लॉजिस्टिक हब्स आदी प्रमुख आर्थिक केंद्रांना याचा लाभ होईल. दरवर्षी ४६.१ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक सुलभ होईल, असा रेल्वे प्रशासनाचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT