खडवली : खडवली कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या मार्गिकच्या कसारा ते खर्डी या १४ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण शनिवारी, १७ऑक्टोबर रोजी मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त गुरु प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. या टप्प्यामुळे कसारा मार्गावरील रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.
या कार्यक्रमाला मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना, मुख्य अभियंता रिजवान अहमद, उपमुख्य अभियंता नजीम मुल्ला, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक बी. अरुण कुमार, वरिष्ठ अभियंता सचिन पांचाळ तसेच कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांच्यासह रेल्वे अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
कल्याण-कसारा व कल्याण कर्जत तिसऱ्या मार्गिकेची घोषणा
२०११च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानंतर २४ जुलै २०१६ रोजी तिसऱ्या मार्गिकच्या कामाला सुरुवात झाली. सुमारे दहा वर्षांनंतर कसारा ते खर्डी हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. कसारा मार्गावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीमुळे होणारा खोळंबा तसेच गाड्यांची एकामागोमाग एक रांग लागण्याची समस्या कमी करण्यासाठी ही तिसरी मार्गिका उपयुक्त ठरू शकते.
विशेषतः शहापूर, आसनगाव आणि कसारा परिसरातून मुंबईकडे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या प्रकल्पाचा लाभ मिळू शकतो. मात्र, प्रत्यक्षात लोकल रेल्वेसेवांच्या वेळापत्रकावर याचा किती परिणाम होईल, हे पुढील कार्यपद्धती आणि रेल्वे संचालनावर अवलंबून राहणार आहे. खर्डी ते आसनगाव हा दुसरा टप्पा मार्च २०२७ पर्यंत, तर आसनगाव ते कल्याण हा तिसरा टप्पा डिसेंबर २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण रेल्वेच्या या तिसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण होण्याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्याची मागणी
तिसऱ्या मार्गिकेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासन आणि संबंधित अभियंत्यांचे आभार मानले. उर्वरित खर्डी ते कल्याण टप्प्याचे कामही नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.