कसारा : राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराचा बिर्हाड मोर्चा शनिवारी (दि.१८) मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला. आपल्या विविध मागण्यासाठी कामगाराचा हा मोर्चा १४ ऑक्टोम्बरला नाशिक येथून मुंबईकडे निघाला होता. आज (शनिवारी) मुंबईच्या वेशीवर म्हणजेच कसारा घाटावर येऊन धडकला.
दरम्यान आंदोलकांनी कसारा घाटाजवळ ठिय्या आंदोलन करीत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. मागील वर्षी आदिवासी विकास मंत्र्यांनी आश्वासन देऊन देखील रोजंदारीवर काम करणाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू केले नाही यासह अनेक प्रलंबीत मागण्यासाठी हा मोर्चा मुंबईकडे निघाला आहे. दरम्यान कसारा घाटात ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.डी. एस. स्वामीं, उपविभागीय पोलीस अधीक्षक् मिलिंद शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी संदीप गिते, कसारा पोलीस निरीक्षक सुरेश गावित, इंगतपुरी पोलीस निरीक्षक सारिका आहिररावं यांनी चोखं बंदोबस्त ठेवला होता .
आंदोलकांनी बाह्यस्त्रोत एजन्सीद्वारे केल्या जाणाऱ्या भरत्या रद्द कराव्यात, रोजंदारी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी केली. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून नोकरीवर परत घेण्याचे आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणारे ललित चौधरी यांनी सांगितले.
आदोलकांनी दुपारपासून इंगतपुरीजवळ नाशिक-मुंबई मार्गावर ठिय्या आंदोलन सुरु करीत एक मार्ग बंद केला.त्यामुळे महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवली. दरम्यान आंदोलकांनी आपला मोर्चा रस्त्यावरच ठाण मांडून ठेवत मुक्काम ठोकला असून सकाळपर्यत निर्णय न लागल्यास तीव्र आंदोलन करीत मोर्चा मुंबईकडे जाणार असल्याचे आदोलकांनी सांगितले.