Crime News pudhari photo
ठाणे

Kalyan Stabbing Case: पूर्ववैमनस्यातून कल्याणात तरुणाचा निर्घृण खून; मैत्रिणीलाही ठार मारण्याचा प्रयत्न

सशस्त्र हल्लेखोर टोळी भूमिगत

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: गुरुवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या काकाचा ढाब्या जवळील अंजनाबाई भाने उद्यानाबाहेर काळजाचा थरकाप उडविणारी घटना घडली. पूर्ववैमनस्यातून सशस्त्र टोळक्याने २८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला.

दरम्यान हा हल्ला सोडविण्‍यास गेलेल्या तरुणाच्या मैत्रिणीवरही हल्लेखोरांनी चाकूने वार केले. एकीकडे या हल्ल्यातून प्रत्यक्षदर्शी मैत्रीण थोडक्यात बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मानपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे.

अर्जुन ऊर्फ पेंद्या गजानन काळपांडे (२८) असे हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडील चक्की नाक्यावर असलेल्या गोसावी पुऱ्यातील गजानन काळपांडे चाळीत राहत होता. या प्रकरणी मृत अर्जुनचे वडील गजानन काळपांडे (६२) यांनी दिलेल्या जबानीवरून पोलिसांनी अविनाश, गौरव आणि त्यांच्या साथीदारां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

गोसावी पुऱ्यात गेल्या ४५ वर्षांपासून राहणारे गजानन काळपांडे यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. गजानन यांच्या व्यवसायाला अर्जुन देखी‍ल हातभार लावत असे. अर्जुन आणि हर्ष, किरण आणि विद्यासागर उर्फ आण्णा हे तिघे मित्र होते. यातील हर्ष याचे काही दिवसांपूर्वी अविनाश याच्याशी भांडण झाले आणि तेथूनच वादाची ठिणगी पडली.

गुरुवारी दुपारी ३ वाजता अर्जुन हा दुकानाच्या कामासाठी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वडिलांनी त्याला जेवणासाठी फोन केला असता त्यने आपण बाहेर जेवण केल्याचे सांगितले. रात्री ११.३० च्या सुमारास वाजता अर्जुनचा मित्र संतनू याने फोन करून अर्जंट हॉस्पिटलला या, असे सांगितले.

हे कळताच गजानन त्यांच्या पत्नी विजया आणि मुलीसह तातडीने हॉस्पिटलला पोहोचले. अर्जुनचे मित्र विद्यासागर ऊर्फ आण्णा, हर्ष आणि किरण यांनी अविनाश आणि गौरव या दोघांनी अर्जुनवर चाकूने हल्ला केल्याचे सांगितले. हॉस्पिटलमध्ये पाहिले असता अर्जुनच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.

मैत्रिणीने सांगितला हल्ल्याचा थरार

हॉस्पिटलमध्ये अर्जुनच्या मैत्रीणीने घडलेल्या थरारक घटनेची माहिती दिली.रात्री ११.४५ च्या सुमारास बहीण आणि अर्जुनसह उद्यानाबाहेर रोडवर बोलत उभे असताना काही अनोळखी लोकांनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून अर्जुनला शिवीगाळ केली.

अविनाश याने अर्जुनच्या पोटात चाकू खुपसला. तर गौरव यानेही चाकूने पाठीवर वार केले. या हल्ल्यात अर्जुन गंभीर जखमी झाला. त्यांचे भांडण सोडविण्‍यास गेली असता अविनाश याने आपल्यावरही चाकूने सपासप वार केल्याचे मैत्रिणीने सांगितले.

दरम्यान हल्ल्याचे वार हातावर झेलल्याने या हल्ल्यात ती थोडक्यात बचावली. तिच्या हाता-पायाला जखमा झाल्या. त्यानंतर थोड्या वेळातच अर्जुनचा मित्र विद्यासागर आण्णा तेथे आला आणि त्याने अर्जुनला हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र तत्पूर्वीच त्याने प्राण सोडला होता. समाज माध्यमांवरही अर्जुन लोकप्रिय होता. मित्रांनी त्याच्या मृत्यूप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

क्राईम ब्रँचकडून समांतर तपास सुरू

या प्रकरणी गजानन काळपांडे यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी अविनाश (रा. कल्याण-पूर्व) गौरव (कल्याण-पूर्व) आणि त्यांच्या साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अर्जुन उर्फ पेंद्या काळपांडे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडे पाठवून दिला.

या हल्ल्यानंतर अर्जुनचे सर्व मारेकरी हे नाट्यमयरित्या भूमिगत झाले आहेत. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटनेही समांतर तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT