सापाड : कल्याण पश्चिमेकडील चांभारवाडा परिसरातील आझाद फरीद चाळ येथे 'लस कल्याणाची' उपक्रमांतर्गत लसीकरण जनजागृती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. झेड.एम.क्यू. एनजीओ आणि पुढारी न्युज यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या लसीकरण जनजागृती चर्चासत्रात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून लसीकरणाविषयी महत्त्वाची माहिती उपस्थित महिलांना मिळवली. या चर्चा सत्रामध्ये एकूण २६ महिलांनी सहभाग नोंदवला.
लसीकरण जनजागृती मोहिमेतून तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली समाजात लसीकरणाविषयी जागरूकता वाढविण्यात आली असून लसीकरणाविषयी समाजात निर्माण होणारे गैरसमज दूर करण्यात आले, परिणामी जनजागृती मोहिमेतून योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहचवून बालकांना वेळेवर लस देण्याचे महत्त्व पटवून देण्यात आल्यामुळे समाजात लसीकरणाचा टक्का देखील वाढल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले. तर 'लस कल्याणाची' व्हॉट्सअॅप चॅनलशी नागरिकांना जोडून त्यांना नियमित आरोग्यविषयक अद्ययावत माहिती मिळावी यावर भर देण्यासाठी उपस्थित सामुदायिक प्रतिनिधींकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले.
लसीकरण चर्चासत्राची सुरुवात झेड.एम.क्यू. एनजीओच्या शोभा यांनी स्वागत व प्रास्ताविकाने केली. त्यांनी लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन करत वेळेवर लस घेतल्यास मुलांचे गंभीर आजारांपासून संरक्षण होत असल्याचे पटवून दिले. तसेच 'लस कल्याणाची' उपक्रमाची माहिती देत या माध्यमातून नागरिकांना अचूक माहिती कशी मिळते, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी स्थानिक मतपरिवर्तन करणारे प्रतिनिधी दुर्गा शिंदे आणि नंदा पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असलेल्या दुर्गा शिंदे यांनी लसीकरणाचे फायदे स्पष्ट करत प्रत्येक मुलाला सर्व लसी वेळेवर मिळणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
लस कल्याणाची' गटातून मिळणारी माहिती त्या पालकांपर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रश्नोत्तर सत्रातून नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. नंदा पाटील यांनीही आपल्या अनुभवातून सांगितले की, या उपक्रमाशी जोडल्यापासून त्या आपल्या परिसरातील कुटुंबांना लसीकरणाबाबत सतत प्रोत्साहित करत आहेत. विशेषतः लहान मुलांच्या मातांना व्हॉट्सअॅप चॅनलशी जोडून योग्य माहिती मिळवण्याचे आवाहन त्यांनी केले.
चर्चा सत्रादरम्यान 'अफवा आणि वास्तव' या विषयावर प्रश्नोत्तरे आणि क्विझ यांसारख्या उपक्रमांद्वारे लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यात आले. चर्चा सत्रात सहभागी नागरिकांनी उत्साहाने प्रतिसाद देत योग्य उत्तरे दिली, ज्यामुळे त्यांची लसीकरणाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. या चर्चासत्र कार्यक्रमाचे समन्वयन झेडएमक्यूच्या फील्ड टीममधील रहीम, शोभा, ज्योती आणि नगमा यांनी केले. तसेच नागरिकांना 'लस कल्याणाची' व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सत्राच्या शेवटी सर्वांनी एकत्र येत 'पाच साल, सात बार छुटे ना टीका एक भी बार' या घोषवाक्यातून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. यानंतर सर्व सहभागी नागरिकांना माहितीपत्रकांसह भेटवस्तू देण्यात देऊन गौरवण्यात आले. एकूणच, या लसीकरण चर्चा सत्राला स्थानिक नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लसीकरणावावत जागरूकता, विश्वास आणि सामूहिक जबाबदारी वाढत असल्याचे चित्र दिसून आले. 'लस कल्याणाची' उपक्रमामुळे भविष्यात अधिकाधिक मुलांना वेळेवर आणि पूर्ण लसीकरण मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.