डोंबिवली : कल्याण जवळच्या उंबर्डे गावात विभक्त राहणाऱ्या पत्नीने सोबत येण्यास इन्कार केल्याने संतप्त झालेल्या पतीने 9 वर्षांच्या मुलासमोरच तिचा खात्मा केला. हत्या केल्यानंतर नाशिकला पसार झाल्यानंतर स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेल्या या खुन्याला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या खुन्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अर्चना उर्फ बाली विशाल भुतकर (25) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती विशाल साहेबराव भुतकर (30) याने हा खून केल्याचा आरोप आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, भुतकर दाम्पत्य गेल्या दीड वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे विभक्त राहत होते. विशाल हा मोठ्या मुलासह नाशिकमध्ये राहतो. तर पत्नी अर्चना कल्याण जवळच्या उंबर्डे गावात असलेल्या केडीएमसीच्या गार्डन जवळील एका चाळीत राहून घरकाम करून आपल्या पाच वर्षांच्या मुलीचे संगोपन करत होती. सद्या मुलगी परभणीला राहणाऱ्या आईकडे गेली आहे.
बुधवारी 11 मार्च रोजी विशाल मुलासाह नाशिकहून कल्याणमध्ये अर्चना उर्फ बालीला भेटण्यासाठी आला. पुन्हा एकत्र राहून संसार सुरू करण्यासाठी त्याने अर्चनाला गळ घातली. मात्र अर्चनाने सोबत येण्यास इन्कार केला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. आधीच विशाल अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातच तिने सोबत येण्यास नकार दिल्यानंतर विशालच्या संतापाचा कडेलोट झाला. संतप्त झालेल्या विशालने अर्चनावर चाकूने हल्ला करून तिला जागीच ठार केले. हा सारा प्रकार 9 वर्षांच्या मुलासमोर घडत होता. अर्चनाची हत्या केल्यानंतर विशालने नाशिकला पळ काढला.
नाशिकमध्ये राहणाऱ्या भावाला सारा प्रकार सांगितला. भावाने विशालला पोलिसांकडे शरणागती पत्करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात जाऊन विशालने शरणागती पत्करली. पत्नीची हत्या केल्याची त्याने कबुली दिली. नाशिक पोलिसांनी कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. त्यानुसार खडकपाडा पोलिसांनी उंबर्ड्यातील घरी जाऊन खात्री केली असता अर्चनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. नातेवाईकांनी तिची ओळख पटवली.
या प्रकरणी मृत अर्चनाच्या मामेभावाने दिलेल्या फिर्यादीनुसार खडकपाडा पोलिस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार खडकपाडा पोलिसांच्या तपास पथकाने नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांकडून खुनी विशाल भुतकर याचा ताबा घेतला. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, दुचाकी आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नऊ वर्षांचा मुलगा हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे तपासात समोर आले आहे.