Kalyan Ganeshotsav Pudhari
ठाणे

Kalyan Ganeshotsav: कल्याण तालुक्यात ४,५०० घरगुती, ९३ सार्वजनिक गणेशोत्सव

उल्हास, काळू, भातसा, बारवीसह गावतलावांवरील १९ विसर्जन घाटांची दुरवस्था

पुढारी वृत्तसेवा

बजरंग वाळुंज

डोंबिवली: कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत यंदा ९३ सार्वजनिक आणि सुमारे ४ हजार ५०० हजार घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत. या उत्सवासाठी उल्हास, काळू, भातसा आणि बारवी नदीकाठासह गावतलावांवर मिळून १९ विसर्जन घाट निश्चित केले आहेत.

उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी १० अधिकारी, ८६ अंमलदार, होमगार्ड आणि गावोगावचे पोलीस पाटील सज्ज झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात या १९ विसर्जन घाटांची अवस्था अत्यंत बिकट आहे.

घाट आहेत की दलदलीच्या खाड्या असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. घाटांची पाहणी केली असता अनेक घाटांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. घाटाच्या लाद्या तुटलेल्या, फुटलेल्या आणि उखडलेल्या अवस्थेत आहेत.

रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि दिवा-बत्तीची अपुरी व्यवस्था यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होईल अशी गंभीर परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षांत विसर्जनादरम्यान गणेशभक्त बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत, त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कल्याण तालुक्यात ८ ते १० लाख लोकसंख्येसाठी केवळ ८० ते ९० पोलीस कर्मचारी आहेत. गणेशोत्सव काळात पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येतो. ग्रामपंचायत आणि महसूल विभागाने गणेशोत्सवापूर्वी घाटांची दुरुस्ती, स्वच्छता, दिवा-बत्ती, जीवरक्षकांची नेमणूक, रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, आदी उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह गणेशभक्तांकडून करण्यात येत आहे.

यासाठी प्रशासनासह स्थानिक रहिवासी आणि गणेशभक्तांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी केले आहे.

कल्याण तालुक्यातील गणेशोत्सव

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे : ९३

घरगुती गणपती : ४,५००

विसर्जन घाट : १९ (उल्हास, काळू, भातसा, बारवी नदी + गावतलाव)

पोलीस बंदोबस्त : १० अधिकारी, ८६ अंमलदार

समस्या : घाटावर चिखल, तुटलेल्या लाद्या, खड्डे, अपुरी प्रकाश व्यवस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT