KDMC  pudhari photo
ठाणे

Street Vendor Harassment Case: महापौरांच्या पाहणी दौऱ्यातून काय साध्य झाले? संतप्त कल्याणकरांचा केडीएमसी प्रशासनाला सवाल

परफ्यूम न घेतल्याने तरुणीची छेडछाड; मित्रालाही फेरीवाल्याकडून मारहाण

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्या पाहणी दौऱ्यातून काय साध्य झाले ? असा काय परिणाम झाला ? की जेणेकरून फेरीवाले स्टेशन परिसरातून रफुचक्कर झाले का ? असा संतप्त सवाल कल्याणकर विचारत असतानाच कल्याणात उन्मत्त फेरीवाल्यांची गुंडगिरी दिवसेंदिवस फोफावत चालल्याची घटना चव्हाट्यावर आली.

परफ्यूम न घेतल्याच्या रागातून एका उन्मत्त फेरीवाल्याने तरूणीची छेडछाड करत तिच्या मित्रालाही बेदम झोडपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

यातील तक्रारदार तरूणी २० वर्षी असून तिचा मित्र हर्ष शर्मा (२०) हे दोघे कपड्यांचा व्यवसाय करतात. रविवारी सकाळी कपडे आणण्यासाठी ते मुंबईतील दादर येथे गेले होते. दुपारी खरेदी उरकून ते लोकलने कल्याण स्टेशनवर परतले.

यादरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उतरून ते ऑटोरिक्षा पकडण्यासाठी जात असताना प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बाजूला एक फेरीवाला परफ्यूमचा ठेला लावून विक्री करत होता. दोघेजण परफ्यूम पाहण्यासाठी थांबले असता फेरीवाला परफ्यूम दाखवत असताना तरूणीने परफ्यूम घेण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने उद्धट वर्तन करत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली.

वादादरम्यान फेरीवाल्याने तरूणीच्या मित्राला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व ओढत नेले. इथेच न थांबता त्याने पिडीत तरूणीलाही अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेनंतर पिडीत तरूणीने तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली.

फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या हर्ष शर्मा याला पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी रूक्मिणीबाई रूग्णालयात पाठवले. उपचारानंतर दोघांनी पोलिस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची माहिती दिली.

पोलिसांनी या प्रकरणी पिडीत तरूणीच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला. याच दरम्यान परफ्यूम विकणारा इसम स्वतः पोलिस ठाण्यात आला. विचारपूस केली असता त्याने आपले नाव सलीम नाजीम खान (१८) असे सांगितले. तक्रारदारतरूणीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी हल्लेखोर सलीम खान याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याच्यावर अटकेची कारवाई केली.

गुंड फेरीवाल्यांचा माज कोण उतरवणार ?

कल्याण पश्चिम परिसर तसेच स्कायवॉक हा फेरीवाल्यांसाठी वर्षानुवर्षे आंदण बनला आहे. काही दिवसांपूर्वीच महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी या भागात पाहणी दौरा करून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना दम भरला होता. मात्र पुढील काही दिवसांत परिस्थिती जैसे-थेच झाल्याने महापौरांच्या पाहणी दौऱ्यातून नेमके काय साधले ? महापौरांचा तो फार्स होता का ? असा सवाल कल्याणकर विचारू लागले आहेत.

स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या कल्याण शहरात अशाप्रकारे उन्मत्त फेरीवाल्यांकडून होणारी गुंडगिरी लक्षात घेता केडीएमसी प्रशासन आणि पोलिस कायमस्वरूपी कठोर कारवाया का करत नाहीत ? असा सवालही कल्याणकर गृहिणी, जेष्ठ नागरिक आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT