kalyan shil road traffic jam pudhari photo
ठाणे

kalyan shil road traffic jam : कल्याण-शिळ मार्गावर 'रॉंग साईड'चा वापर

वाहतूक नियम पायदळी; कारवाई थंडावताच पुन्हा रॉंग साईड'' सुरू

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच गणेशोत्सवाच्या काळात या समस्येने आणखी उग्र रूप धारण केले आहे. वाहतूक नियम पायदळी तुडवत वाहनचालकांकडून सर्रास 'रॉंग साईड'चा वापर होत आहे. त्यामुळे कोंडीत भर पडत असून, काही दिवसांपूर्वी सुरू केलेली वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई थंडावताच परिस्थिती पुन्हा जसे थे झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कल्याण शिळ मार्ग हा कल्याण-डोंबिवलीसह पलावा, शिळफाटा, ठाणे, नवी मुंबई आणि पुढील परिसराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. गणेशोत्सवामुळे त्यात आणखी वाढ झाली असून, विशेषतः सायंकाळच्या वेळेत वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत.

देसाई गाव परिसरापासून पलावा उड्डाणपूलाच्या दिशेने वाहतूक संथ होऊन अनेकदा वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वेळ कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रँग साईडने वाहन हाकणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची मागणी केली जात होती. मात्र एक आठवडा वाहनचालकांना शिस्त लावल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. वाहतूक कोंडीतून लवकर बाहेर पडण्यासाठी काही वाहन चालक रँग साईडने वाहन हकण्याचा मार्ग स्वीकारत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना अडथळा निर्माण होतो आणि आधीच संथ असलेली वाहतूक आणखी खोळंबत आहे. विशेषतः चारचाकी आणि दुचाकीस्वाररांकडून 'रँग साईड'चा वापर होत असल्याचे चित्र वाहतूक कोंडीच्या ठिकाणी दिसून येत आहे. एकीकडे गणेशोत्सवातील वाढलेली वाहतूक, दुसरीकडे पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यात 'रॉंग साईड'ने वाहन चालविण्याचे प्रकार यामुळे कल्याण-शिळ मार्गावरील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. केवळ मधूनमधून दंडात्मक कारवाई करण्याऐवजी कोंडीच्या प्रमुख ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्याची गरज आहे.

निर्णयांचे उल्लंघन

  • कल्याण-शिळ मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भूमिपुत्र धर्माभिमानी संधाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन दिले होते. यावेळी तात्काळ वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला ठाणे मनपाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयांचे काही कलखंडाच उल्लंघन सुरू झाल्याने पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT