नेवाळी ( ठाणे) : कल्याण शीळ रस्त्यावरील काटई चौकाला खड्ड्यांचे विघ्न लागले आहे. जलमय झालेल्या खड्ड्यांमध्ये वाहन आदळत असल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळविणार्या कल्याण डोंबिवली क्षेत्रात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालक संतापले आहेत.
कल्याण शीळ रस्त्यावरील काटई चौक वर्दळीचा असून या चौकात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या असते. कोंडीचा जाच असताना आता खड्ड्यांचा मनस्ताप सुरू झाल्याने वाहनचालक संतापले आहेत.
कल्याण-शीळ रस्त्यावरील काटई चौकात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे काटई चौकातील वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे. मुसळधार पावसात चौकातील पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपायोजना न झाल्याने चौक जलमय स्थितीत आहे. बदलापूर, अंबरनाथपासून चाकरमानी ठाणे, मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने कामावर जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. तर कल्याण डोंबिवलीकरांना देखील काटई या मुख्य चौकातूनच प्रवास करावा लागतो. मात्र जलमय परिस्थितीमुळे चौकाला खड्ड्यांचे ग्रहण लागल्याने वाहनचालकांचे मोठे नुकसान होत आहे. खड्डेमय परिस्थितीकडे केडीएमसीसह एमएमआरडीएकडून देखील दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे काटई चौक खड्डे मुक्तीसाठी कोण पुढाकार घेणार? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
चौकातून जाताना खड्डे पाण्याने भरलेले असतात. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन खड्ड्यात आदळून प्रवासी संतापतात. परंतु त्यांनी आमच्यावर संतापण्यापेक्षा संबंधित सत्ताधारी, लोकप्रतिनिधींवर वैतागले पाहिजे. प्रवाश्यांचे हाल होतात, तसे आमचा देखील वाहनांना मेन्टनन्स असतोच ना!कैलास म्हात्रे, रिक्षाचालक