Kalyan Shil Road traffic pudhari photo
ठाणे

Kalyan Shil Road traffic : कल्याण-शिळ मार्ग नेहमीचाच ‘जाम’; कामगार, विद्यार्थ्यांना रोजचाच ‘लेटमार्क’

कामावर जाणारे कर्मचारी, कामगार, विद्यार्थी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही या कोंडीचा मोठा फटका

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : कल्याण-शिळ रस्त्यावर मंगळवारी सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. खिडकाळेश्वर मंदिरापासून देसाई नाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने या मार्गावरील वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला होता. कामावर जाणारे कर्मचारी, कामगार, विद्यार्थी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही या कोंडीचा मोठा फटका बसला.

सकाळची गर्दीची वेळ असल्याने कल्याण-शिळ मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यात अवजड वाहनांची वर्दळ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या विविध अडथळ्यांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास अडचणी निर्माण झाल्या. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अरुंद जागेचा वापर केला. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक आणखी विस्कळीत झाल्याचे चित्र होते.

या मार्गावर सकाळच्या वेळी वाहतूक पोलिसांची गस्त किंवा उपस्थिती नसल्याने वाहनांचे नियमन व्यवस्थित होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात आली.

दररोज हजारो नागरिक कल्याण-शिळ मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन वेळापत्रकावर होत आहे. शालेय वाहने, एसटी बस तसेच अन्य सार्वजनिक वाहतूक वाहने कोंडीत अडकत असल्याने विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे. कामावर वेळेत पोहोचण्यासाठी घराबाहेर पडलेल्या कामगार आणि नोकरदार वर्गाचीही मोठी गैरसोय झाली.

कल्याण-शिळ रस्त्यावरील वाढती वाहतूक लक्षात घेता सकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करावी, अवजड वाहनांचे योग्य नियोजन करावे तसेच रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT