Kalyan Traffic Jam Pudhari
ठाणे

Kalyan Traffic Jam: कल्याण फाट्यावर वाहतूक कोंडी विरोधात जनआक्रोश

सर्वपक्षीय नेत्यांसह सामाजिक संघटनांचा आंदोलनात सहभाग

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी: कल्याण शिळ फाटा येथे रविवारी वाहतूक कोंडीविरोधात जन आंदोलनाची हाक देत जनआक्राेश करण्‍यात आला. शिळ फाटा, कल्याण फाटा वाहतूक कोंडी प्रश्नी रविवारी जन आंदोलनाची हाक कल्याण फाटा चौकात देण्यात आली होती.

यावेळी कल्याण फाट्यावर वाहतूक कोंडी विरोधात "जन आक्रोश" करण्‍यात आला. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपा आणि स्थानिक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या आंदोलनात प्रशासनाच्या दुर्लक्षितपणावर बोट ठेवण्यात आला आहे. तर नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याच्या भीतीने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त कल्याण फाटा चौकात तैनात केला होता.

कल्याण फाटा परिसरातील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाला समोर जावं लागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड वाढली आहे. मात्र वाहतुकीचे अपुरे नियोजन आणि सुरू असलेले दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना तासन्ता‌स वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे.

रस्त्यांवरील अतिक्रमणे देखील हटविण्‍यात येत नसल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडी विरोधात मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष हर्षद पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांनी आणि राजकीय पक्षातील नेत्यांनी लक्षणीय सहभाग घेतल्याचे दिसून आले आहे.

अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना बसत आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या वतीने सात दिवस आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान ६४ वाहनांची तोडफोड झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर काही काळ वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली होती.

मात्र आता पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाल्याचा दावा मनसेने कडून करण्यात आला आहे. या आंदोलनात मनसेचे नेते राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हिरा पाटील, २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष हक्क समिती उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे,२७ गाव युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील, शहर अध्यक्ष हर्षद पाटील, कॉ. काळू कोमस्कार, भूमिपुत्र धर्माभिमानी संघाचे महेंद्र पाटील, दक्ष नागरिक संघ, नागरिक सहभागी झाले होते.

...तर यापुढे गाड्या आणि टोल नाका फोडू!

कल्याण फाटा ते दहिसर नाका दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. टोल वसुलीसाठी निबंध असताना देखील वाहन सोडली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला नाही, तर यापुढे गाड्या आणि टोल देखील फोडण्याचा इशारा मनसे नेते राजू पाटील यांनी दिला आहे.

आजचे आंदोलन हा केवळ इशारा असून, प्रश्न मार्गी न लागल्यास पुढील भूमिका अधिक आक्रमक असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील सिग्नल यंत्रणा प्रत्यक्षात सिग्नल यंत्रणा सुरू झालीच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

वाहतूक पोलिसांच्या पुढील नियोजनाकडे लक्ष!

परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन करणे गरजेचे झाले आहे. सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र वाहतूक पोलीस ट्रॅफिक वार्डनवर जबाबदारी सोपवून काम पार पाडत असल्याचा आरोप आंदोलनात करण्यात आला आहे. यावेळी वाहतूक शाखेचे उपयुक्त पंकज शिरसाट यांनी एक आठवडा राबवलेल्या नियोजनाचा दाखला देत त्यांचे कौतुक देखील करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT