Accident  Pudhari
ठाणे

Kalyan Accident | कल्याण-शिळ महामार्गावर भरधाव रिक्षा उलटून तरूणी ठार : तरूण जखमी

बेदरकार रिक्षावाल्याला ताब्यात घेऊन रिक्षा जप्त

पुढारी वृत्तसेवा

Kalyan-Shil Highway Rickshaw accident

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या दावडी गावाच्या नाक्यावर रात्री सव्वा अकराच्या सुमारास विचित्र अपघात घडला. अनियंत्रित झालेली भरधाव रिक्षा पलटल्याने या रिक्षातून प्रवास करणारी मिनल प्रकाश यादव (३५) ही ठार झाली. तर सोबत असलेला तिचा मित्र आशिष चव्हाण (४०) गंभीर स्वरूपात जखमी झाला. मानपाडा पोलिसांनी या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बेदरकार रिक्षावाल्याला ताब्यात घेऊन त्याची रिक्षा जप्त केली आहे.

या संदर्भात कल्याण-मोहने रोडला असलेल्या शहाड मधील मातृस्नेहा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या जय प्रकाश यादव (२६) या तरूणाने दिलेल्या जबानीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच महामार्गावरील सोनारपाडा गावातल्या कृष्णा वाडीमधील गावदेवी कृपा चाळीत राहणाऱ्या प्रभण्णा बाबुराव जिरोले (४२) याच्या एम एच ०५/एफ डब्ल्यू/ ५०५० क्रमांकाच्या रिक्षातून फिर्यादी जय याची बहीण मिनल (३५) आणि तिचा मित्र आशिष चव्हाण (४०) असे दोघे प्रवास करत होते.

भरधाव वेगातील ही रिक्षा दावडी गावाच्या नाक्यावर येताच अचानक पलटी झाली. यात आशिष चव्हाण याच्या डोके, हात, पाय आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. तर मिनल हिच्या डोक्यास मार लागून ती जबर जखमी झाली. अपघाताचे ते भयाण दृश्य पाहून पादचाऱ्यांनी रिक्षातून ओढून दोघांना बाहेर काढले आणि जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले.

मात्र, मिनल हिच्या डोक्यास मार लागून रात्रस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने तिला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. तर अलीकडे जखमी आशिषची प्रकृती देखिल चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने भरधाव वेगात रिक्षा चालवून या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या प्रभण्णा जिरोले याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक के. आर. पाटील अधिक तपास करत आहेत.

रिक्षाला कट मारल्याने तरूणी जायबंदी

कल्याण पूर्वेकडे चिंचपाड्यात असलेल्या साईकृपा कॉलनीमधील बुवा म्हात्रे चाळीत राहणारी जान्हवी धरमवीर सौरे (२३) ही तरूणी शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आई आणि बहिणींसह रिक्षाने कल्याण रेल्वे स्टेशनकडून चिंचपाड्याकडे घरी जात होती. तेथील अय्यपा मंदिरासमोर रिक्षा येताच स्टेशनकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अन्य रिक्षाने जोरदार कट मारली. त्यामुळे रिक्षात बसलेल्या जान्हवीच्या उजव्या हाताला दुखापत होऊन तो फ्रॅक्चर झाला.

कट मारणारा रिक्षावाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न करता पळून गेला. या अपघातात जखमी झालेल्या जान्हवीवर रूग्णालयात उपचार सुरू असून तिने दिलेल्या जबानीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार रिक्षावाल्याचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT