नेवाळी (ठाणे) : कल्याण-शीळ रस्त्यावरील पलावा उड्डाणपुलाचे शुक्रवारी (दि.4) शिंदेच्या शिवसेनेने लोकार्पण केले होते. अपूर्ण कामामुळे काही वेळातच उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्याची नामुष्की शिवसेनेवर आली होती.
शिव सेनेच्या या गुपचूप लोकार्पणावर आता ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. तांत्रिक बाबी पुढे करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकार्पणाचे नारळ फोडणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे.
कल्याण-शीळ रस्त्यावरील सात वर्षांपासून सुरु असलेला पलावा उड्डाणपूल शुक्रवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे यांनी शिवसैनिकांसह लोकार्पण केले होते. मात्र उड्डाणपुलावर दुचाकीस्वारांचे अपघात सुरु झाले असल्याची माहिती मिळताच तातडीने उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र तांत्रिक बाबी न तपासता घाईघाईत झालेल्या लोकार्पणावरून विरोधकांनी सत्ताधार्यांना चांगलेच लक्ष केले होते. त्यावर आता ठाकरेंच्या सेनेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोकार्पणाचे नारळ वाढविणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीच त्यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले की, पलावा उड्डाणपुलाच्या संदर्भात शिवसेना मनसेकडून आंदोलन करण्यात आले होते. पलावा उड्डाणपुलाचे काम लवकर व्हावे आणि ट्रॅफिकच्या जाचातून लोकांची सुटका व्हावी यासाठी आमचा प्रयत्न होता. परंतु सत्ताधारी पक्षाच्या लोकांना एक गोष्ट कळत नाही आहे कि, या पुलाचे काम अर्धवट असताना घाईघाईने फक्त श्रेय लाटण्यासाठी काही लोकांनी या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. त्या उड्डाणपुलावर अनेक लोकांचे अपघात झाले, काही लोकांना दुखापत सुद्धा झाली. लोकांचे जीव धोक्यात टाकण्यात आला. यात सर्व ज्या ज्या लोकांनी उदघाटन केलय,ज्यांनी ज्यांनी विशेषतः नारळ फोडले त्या सर्वांवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत.
पलावा उड्डाणपुलावर ऍस्पाईड मास्टिक टाकून हा पूल करण्यात यावा अशी टेंडरमध्ये अट असताना या पुलावर ऍस्पाईड मास्टिक टाकता आलेले नाही. फक्त डांबर टाकून ते ऍस्पाईड मास्टिक सारखं दिसावं म्हणून यासाठी डांबराचा स्प्रे करण्यात आला. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते मी प्रशासनाकडे देत आहे. या ठेकेदारावर आणि ज्या लोकांनी या उड्डाणपुलाचे घाईघाईत उदघाटन केलं त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत अशी विनंती ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.
या पुलाचे एखादा काँट्रॅक्ट दिल्यानंतर त्याच एक पत्र असत हॅन्डओव्हर लेटर (कारभार हस्तांतरण पत्र) म्हणतात त्याला ते देखील ठेकेदाराने दिले नव्हते. तर या लोकांनी या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले कसे? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडतोय आणि जर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत. आणि या उड्डाणपुलाचे काम त्वरित पूर्ण करून हा पूल लोकांसाठी सुरु करावा असं दीपेश म्हात्रे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.