बजरंग वाळुंज
डोंबिवली : कल्याण-कल्याण महानगरपालिका हद्दीमध्ये शहर आणि ग्रामीण पट्ट्यातील प्रमुख चौक, नाके आणि वर्दळीच्या ठिकाणी चायनीज पाठोपाठ शोरमाच्या गाड्यांचे स्तोम माजले आहे. या गाड्यांवर शोरमा बनविण्यासाठी वापरण्यात येणारे चिकन अर्धवट शिजलेले तर असतेच, शिवाय उघड्यावर गॅसच्या सिलिंडरचा वापर केला जात असल्याने खवय्यांच्या आरोग्यासह सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे चायनीज आणि शोरमाचे ठेले केडीएमसीच्या फुटपाथवर मोक्याच्या ठिकाणी उभे राहत असल्याने पादचाऱ्यांना चालायला देखील जागा शिल्लक नसल्याचे दिसून येते.स्थानिक रहिवाशांच्या मते काही गाड्यांवर वापरले जाणारे गॅस सिलिंडर बेकायदा असल्याने त्याच्यापासून गॅस गळती किंवा आग लागण्याचा धोका नाकारता येत नाही.
तसेच अन्न बनविताना स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे. अर्धवट शिजलेले चिकन, उघड्यावर ठेवलेले साहित्य, तसेच सॉस व इतर घटकांच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित होत आहे. असे उघड्यावरील अर्धवट शिजलेले शोरमासारखे पदार्थ खाल्ल्याने अन्न विषबाधा होण्याचा धोका असतो.
उघड्यावर बिनधास्तपणे सुरू असलेल्या शोरमाच्या ठेल्यांवर तरुण वर्ग, विशेषतः विद्यार्थ्यांच्या उड्या पडलेल्या दिसतात. तरुणाई आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या चायनिजसह शोरमासारख्या खाद्यपदार्थांच्या ठेल्यांवर केडीएमसीकडून कारवाया करण्यात असमर्थता असल्यामुळेच त्याचे स्तोम दिवसेंदिवस माजत चालले आहे.
आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असलेले हे ठेले आणि हातगाड्यांवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कारवाया कराव्यात. या कारवायांमध्ये सातत्य ठेवावे, अशीही अपेक्षा पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.
उघड्यावरचा शोरमा आरोग्यासाठी धोकादायक... रस्त्यावर, उघड्या गाड्यांवर बनणारा शोरमा खाणे म्हणजे अन्न विषबाधेला आमंत्रण देण्यासारखे आहे. यातून 5 मोठे धोके उद्भवू शकतात. बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव आणि विषबाधा होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या शोरमातील चिकन/मटण मोठ्या लोखंडी रॉडवर लावून तासन्तास फिरत असते. वरचा भाग शिजतो, पण आतला भाग कच्चट राहतो. परिणामी बॅक्टेरिया त्यात जिवंत राहतात. असा शोरमा खाल्ल्यावर उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू होऊन खवय्याला तापही येतो. केरळ, मुंबई, पुण्यात शोरमा खाल्ल्यामुळे अनेकांना हॉस्पिटलमध्ये जावे लागले, तर काहींचे मृत्यूही झाले आहेत.
नियम काय सांगतो?
तज्ज्ञांच्या मते, अर्थात भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणानुसार शोरमा 63 तापमानात पूर्ण शिजवला पाहिजे. बनविल्यावर 4 तासांच्या आत खाल्ला पाहिजे. मेयोनीज 5 खाली फ्रीजमध्ये ठेवावे. उघड्यावरच्या स्टॉलवर हे पाळले जात नाही. बंद हॉटेल, योग्य तापमान, स्वच्छता असेल तर शोरमा ठीक आहे. पण, उघड्यावर, धुळीत, फ्रीजशिवाय बनणारा शोरमा हा अन्न विषबाधेचा सापळा मानला जातो. उन्हाळा आणि पावसाळ्यात हाच शोरमा उलटी, जुलाब, पोटदुखी, ताप यासारख्या अन्न विषबाधेला कारणीभूत ठरू शकतो.